परीक्षांच्या हंगामामुळे पर्यटक रोडावले
By Admin | Published: March 11, 2017 02:17 AM2017-03-11T02:17:25+5:302017-03-11T02:17:25+5:30
दहावी, बारावी, तसेच शालेय परीक्षांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ओस पडू लागली आहेत. पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे
अलिबाग : दहावी, बारावी, तसेच शालेय परीक्षांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ओस पडू लागली आहेत. पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे पर्यटन व्यवसाय थंडावला आहे. त्याचा थेट परिणाम रोजगारावर होऊन आर्थिक संकट ओढावले आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, माथेरान, मुरुड, श्रीवर्धन अशा महत्त्वाच्या ठिकाणी पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. ऐतिहासिक, धार्मिक, जंगल, कृषी पर्यटनासाठी मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांची येथे रीघ लागलेली असते. विदेशी पर्यटकांनाही येथील पर्यटन स्थळांची भुरळ पडलेली आहे. येथे होणाऱ्या विविध फेस्टिव्हल, पर्यटन महोत्सवामध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे. या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यात करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना मौजमजा करायला मिळते, त्याचप्रमाणे समुद्र सफर, विविध मनोरंजनाच्या साधनांवर स्वार होण्याचा आनंदही लुटता येतो. दहावी, बारावी आणि शाळेच्या परीक्षा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले अलिबाग शांत आहे. पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे स्थानिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे. घोडा-गाडी, उंटाची सफर, बाइक राइड, एटीव्ही राइड, बोटिंग अशा विविध मनोरंजनाच्या साधनांना ब्रेक लागला आहे.
परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे विविध व्यवसायावर नक्कीच परिणाम झाला असल्याचे बोटिंग व्यावसायिक प्रकाश भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नोटाबंदीनंतर काही प्रमाणात व्यवसायाला सुरुवात झाली होती. मात्र परीक्षा सुरू झाल्याने त्यामध्ये खंड पडला आहे. सुट्यांचा हंगाम सुरू झाल्यावर पुन्हा पर्यटन व्यवसायाला झळाळी प्राप्त होईल, असा विश्वासही भगत यांनी व्यक्त केला.
परीक्षा सुरू असल्याने पर्यटकांची संख्या रोडावली आहे. पर्यटक येण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे रोजचा खर्च निघणेही मुश्कील झाले आहे, असे नागाव येथील मोरे कॉटेजचे संतोष मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पर्यटन स्थळांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना मौजमजा करायला मिळते, त्याचप्रमाणे समुद्र सफर, विविध मनोरंजनाच्या साधनांवर स्वार होण्याचा आनंदही लुटता येतो. दहावी, बारावी आणि शाळेच्या परीक्षा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.