समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची ‘भरती’, हॉटेल्स, कॉटेजेस फुल्ल, नऊ दिवसांत ८,८०० पर्यटकांची भेट

By निखिल म्हात्रे | Published: November 19, 2023 06:02 PM2023-11-19T18:02:51+5:302023-11-19T18:03:05+5:30

दिवाळीनिमित्त २७ नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुटी आहे.

Tourists influx on beaches, hotels, cottages full, 8,800 visitors in nine days |  समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची ‘भरती’, हॉटेल्स, कॉटेजेस फुल्ल, नऊ दिवसांत ८,८०० पर्यटकांची भेट

 समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची ‘भरती’, हॉटेल्स, कॉटेजेस फुल्ल, नऊ दिवसांत ८,८०० पर्यटकांची भेट

अलिबाग : दिवाळीच्या सुटीनिमित्त रायगड जिल्हा पर्यटकांच्या गर्दीने फुलला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मात्र मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. येथील हॉटेल्स, कॉटेजेस फुल्ल झाले आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. ११ नोव्हेंबरपासून ते १९ नोव्हेंबरपर्यंत दरदिवशी ५०० पर्यटक कारने आणि ३३० पर्यटक बोटीने दाखल झाल्याचे वाहतूक पोलिसांकडील नोंदीतून समोर आले. नऊ दिवसांत एकूण ८ हजार ८०० पर्यटकांनी रायगड जिल्ह्याचे दर्शन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिवाळीनिमित्त २७ नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुटी आहे. या सुटीचा आनंद लुटण्यासाठी काही पर्यटक आपल्या कुटुंबीयांसमवेत, तर काही मित्रमंडळींसमवेत रायगड जिल्ह्यात येऊ लागली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, गड - किल्ले आदी पर्यटनस्थळे गर्दीने फुलली आहेत. सुटी घालविण्यासाठी पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला पर्यटनासाठी पसंती दर्शविली आहे.

अलिबागसह नागाव, आक्षी, वरसोली, किहीम, मांडवा, आवास, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिघी असे अनेक समुद्रकिनारे गर्दीने ओसंडून वाहत आहेत. अनेक जण समुद्राच्या लाटांच्या सान्निध्यात राहून पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. काहींनी घोडागाडी, एटीव्ही बाइक्सवर स्वार होऊन समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटला. काहींनी सागरी क्रीडांचा आनंद घेत सुटी उत्साहात घालविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण किनारे पर्यटकांनी गजबजून गेले. समुद्रकिनारी असलेल्या स्टॉल्समधून वडापाव, भजी, पॅटीस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांवर पर्यटक ताव मारत आहेत.

माशांवर पर्यटकांचा ताव
अलिबागसह जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स, कॉटेजेस पर्यटकांनी फुल्ल झाले होते. बुधवारपर्यंत या ठिकाणी प्रचंड गर्दी असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात फिरण्यास आल्यावर ताजी मासळी खाण्यावर पर्यटकांकडून अधिक भर दिला जात आहे. पापलेट, सुरमई, बांगडा आदी विविध प्रकारच्या ताज्या मासळीवर पर्यटक ताव मारत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. धावपळीच्या जीवनात पर्यटन ही एक आमच्यासाठी पर्वणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कुटुंंबीय दिवाळीच्या सुटीत अलिबागमध्ये फिरण्यास येतो. यंदाही आम्ही अलिबागमध्ये सुटीत फिरायला आलो आहोत. समुद्रकिनाऱ्यांच्या सान्निध्यात सुटीचा आनंद घेताना सर्व ताण कमी होण्यास मदत होत असून, एक वेगळा उत्साह यातून मिळतो. - अमर पवार, पर्यटक
 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यटक रायगड जिल्ह्यात येऊ लागले आहेत. पुढील रविवारपर्यंत कॉटेजची बुकिंग फुल्ल झाली आहे. पर्यटकांच्या या वाढत्या प्रतिसादामुळे हा व्यवसाय चांगला चालत आहे. - राजेंद्र बानकर, कॉटेज व्यावसायिक

Web Title: Tourists influx on beaches, hotels, cottages full, 8,800 visitors in nine days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.