पर्यटकांची पावले वळली माथेरानकडे; स्टॉलधारकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 11:25 PM2019-10-29T23:25:25+5:302019-10-29T23:25:43+5:30
लहान-मोठ्या व्यावसायिकांनी सोडला सुटकेचा श्वास
माथेरान : दिवाळी असल्याने सुट्ट्यांच्या या हंगामात देश-विदेशातील पर्यटक आवर्जून भेट देतात. सध्या माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी होत आहे; यामुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. अद्याप हॉटेलमध्ये फारशी गर्दी दिसत नसली, तरीसुद्धा लवकरच पर्यटन हंगाम आखी बहरणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. दिवाळीच्या हंगामात साधारणत: आठ ते दहा दिवस सर्वांनाच चांगल्या प्रकारे व्यवसाय मिळतो.
२००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते; त्यावेळी जवळपास दोन ते अडीच वर्षे मिनिट्रेन सेवा बंद करण्यात आली होती. तीच परिस्थिती याही वेळेस अनुभवायला मिळते आहे. यावेळीसुद्धा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने काही ठिकाणी रेल्वेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नेरळ माथेरान ही सेवा बंद करताना रेल्वेच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांनी माथेरानच्या लोकप्रतिनिधीकडे, वारंवार गाºहाणे घालणाºया शिष्टमंडळाकडे न चा पाढा वाचून आपली जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे याही वेळेस ऐन सुट्ट्यांच्या हंगामात मिनिट्रेनची शटल सेवा उपलब्ध नसतानादेखील नियमितपणे येणारे पर्यटक आणि नवख्या पर्यटकांनी केवळ माथेरानवरील निस्सीम प्रेमापोटी माथेरानला पसंती दिली आहे. दस्तुरीपासून गावापर्यंत तीन किलोमीटर पायपीट करून ते येत आहेत. यामुळे येथील पर्यटन व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्यांना दिला मिळाला आहे. दिवाळी आणि पर्यटन हंगामासाठी बाजारपेठा सजल्या असून अनेक हॉटेलमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पॉइंटवरील छोट्या स्टॉल्स धारकांना पर्यटकांच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे.
पावसाळ्यात विविध पॉइंट भागात रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती, त्या ठिकाणी रस्त्यांची उत्तम प्रकारे डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना चालण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत. मिनिट्रेनची अमन लॉज ते माथेरान स्टेशनपर्यंत शटल सेवा सुरू करण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे प्रयत्नात आहेत. त्यामुळे लवकरच ही सेवा सुरू झाल्यावर पर्यटनात निश्चितच वाढ होण्यास मदत होईल. - प्रसाद सावंत, गटनेते, माथेरान नगरपरिषद