प्रसिद्धीत कमी पडल्याने फणसाडकडे पर्यटकांची पाठ; अभयारण्यात पायाभूत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 12:55 AM2021-03-23T00:55:24+5:302021-03-23T00:55:46+5:30

साधे फलकही नाहीत, पुढील काळात तरी फणसाड अभयारण्याने प्रसिद्धीचा मार्ग अवलंबावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींतर्फे करण्यात येत आहे.

Tourists turn to Phansad due to lack of publicity; Lack of infrastructure in the sanctuary | प्रसिद्धीत कमी पडल्याने फणसाडकडे पर्यटकांची पाठ; अभयारण्यात पायाभूत सुविधांचा अभाव

प्रसिद्धीत कमी पडल्याने फणसाडकडे पर्यटकांची पाठ; अभयारण्यात पायाभूत सुविधांचा अभाव

Next

संजय करडे

मुरुड : मुरुड तालुक्यात दरवर्षी समुद्रकिनारी पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक येथे भेटी देत असतात, परंतु आलेल्या पर्यटकांनी फणसाड अभयारण्य पाहावे यासाठी मात्र पर्यटकांना वळवण्यात फणसाड अभयारण्य प्रशासन अपयशी ठरले आहे. मोजकेच पर्यटक या ठिकाणी येत असल्याने फणसाड अभयारण्याला मिळणाऱ्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. फणसाड अभयारण्यात दरवर्षी महसुली उत्पन्न अंदाजे ६४ हजार रुपये एवढे असावयाचे परंतु मागील दोन वर्षांपासून हे उत्पन्न कमालीचे घटले असून सध्या फणसाडला यापैकी १५ टक्केच उत्पन्न मिळत असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

फणसाड अभयारण्य प्रशासनाने प्रसिद्धी न केल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना हे अभयारण्य कोठे आहे हे माहीत नाही. अलिबाग मार्गे येताना साळाव पुलाच्या मुख्य भागात फणसाड अभयारण्याचा बॅनर अथवा प्रसिद्धिपत्रक लावणे खूप आवश्यक आहे, परंतु हेसुद्धा कित्येक वर्षे न केल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक अभयारण्याकडे वळू शकले नाहीत. मुंबई, पनवेल, पुणे आदी ठिकाणी प्रसिद्धी करणे खूप आवश्यक असतानासुद्धा दुर्लक्ष केल्याने पर्यटक या ठिकाणी येत नाहीत.

पुढील काळात तरी फणसाड अभयारण्याने प्रसिद्धीचा मार्ग अवलंबावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींतर्फे करण्यात येत आहे. या फणसाड अभयारण्यात असणाऱ्या वन्यजीवांचे फोटो लावून पर्यटकांना आकर्षित करणे खूप आवश्यक असताना नेमक्या या कामाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. फणसाड अभयारण्याची स्वतंत्र वेबसाईट नाही. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना अथवा स्थानिक लोकांना येथे कसे यावयाचे याबाबत माहिती नाही. परिणामतः पर्यटक संख्या रोडावत आहे. फणसाड अभयारण्यात विकासकामांवर खर्च केला जात आहे. परंतु ज्या घटकापासून आर्थिक उत्पन्न वाढणार आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. सुमारे ५४ किलोमीटरचा परिसर असल्याने पर्यटकांना चालत जाणे व अभयारण्य पाहणे ही खूप मोठी कठीण बाब आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून फणसाड अभयारण्यात जिप्सी गाडी अथवा बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांची मागणी आहे.

वरिष्ठ कार्यालयाने लक्ष देणे गरजेचे

  • पर्यटकांना जलद व गतिमान सुविधा प्राप्त करून देणे खूप आवश्यक आहे. या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढणार कशी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • असंख्य पर्यटकांनी प्रत्येक टेंटमागे स्वछतागृहांची संख्या वाढवणे आवश्यक असताना काही मोजकेच स्वछतागृह असल्याने असंख्य पर्यटक याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. 
  • फणसाड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना महिला मंडळ ग्रुपमार्फत भोजनाची व्यवस्था केली जाते. परंतु येथील भोजनाचा दर्जा समाधानकारक नसल्याने पर्यटकांना मनपसंत भोजन मिळत नाही.
  • वन्यजीव पाहण्यासाठी गाडी उपलब्ध झाली तर फणसाडचे महत्त्व वाढणार असून महसूलसुद्धा वाढणार आहे. वरिष्ठ कार्यालयाने या बाबीकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

 

निसर्गसंपदेने नटलेले फणसाड अभयारण्य
तालुक्यातील सुपेगाव परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला असून सुमारे ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रात या अभयारण्याचे क्षेत्र व्याप्त असून मुरुड, रोहा व अलिबागच्या सीमारेषेचाही समावेश यामध्ये होत आहे. मुंबईपासून १६० किलोमीटर अंतरावर पनवेल, पेण व अलिबाग मार्गावर विस्तीर्ण असे फणसाड अभयारण्य म्हणजे निसर्गाचे एक वरदान आहे. जगातील सर्वात लांब असलेल्या वेलीपैकी एक असलेली गारंबीची वेल या ठिकाणी आढळून येते. ९० प्रकारची फुलपाखरे येथे बागडताना दिसतात. फुलपाखरामध्ये ब्लू मारगोन, मॅप, कॉमन नवाब अशा वैशिष्ट्यपूर्ण जाती आढळून येतात. 

पक्ष्यांच्या १६४ प्रजाती या ठिकाणी आढळतात. घुबड, तुरेवाला सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे, सातभाई, बुलबुल, हळद्या तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले हरियाल, कोकीळ यासारखे रंगीबेरंगी पक्षी येथे वास्तव्यास आहेत. फणसाड अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळिंदर, त्रास, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, रानमांजर, बिबट्या आदी वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार) सुद्धा येथे आहे. एवढी धनसंपदा असतानासुद्धा फणसाड अभयारण्याची प्रसिद्धी न केल्याने पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

Web Title: Tourists turn to Phansad due to lack of publicity; Lack of infrastructure in the sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.