माथेरान : पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेनसेवा अजूनही बंद आहे. रेल्वे प्रशासनाने अमनलॉज-माथेरान शटलसेवा सुरू केली. मात्र, माथेरानकरांना खरी प्रतीक्षा आहे ती नेरळ-माथेरान सेवा सुरू होण्याची, जीचे भविष्य अजूनही अधांतरीच आहे.
गतवर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या मार्गाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती, त्यामुळे त्याचा फटका शटलसेवेलाही बसला होता. जवळजवळ सहा महिने मिनीट्रेन शटलसेवा बंद होती. मात्र, माथेरानकरांनी केलेल्या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनाला शटलसेवा सुरू करण्यास भाग पाडले. मिनीट्रेन बंद असल्याचा फटका येथील पर्यटनाला बसतो, हे या वेळीही सिद्ध झाले होते, त्यामुळे मिनीट्रेनसेवा सुरळीत सुरू राहवी यासाठी माथेरानकर आग्रही आहेत. त्यामुळेच नेरळ-माथेरानसेवा लवकरच सुरू व्हावी, अशी माथेरानकरांची मागणी आहे.
नेरळ -माथेरान मार्गावर अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू आहेत, हा मार्ग सुरक्षित व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचा योग्य तो विनियोग होत नसल्याचा माथेरानकरांचा आरोप आहे. रेल्वेमार्गावरील सुरक्षिततेकडे लक्ष न देता इतरत्रच त्याचा उपयोग केला जात आहे याचे उदाहरण शटलसेवामार्ग आहे.
या मार्गावर कोणतेही काम न होताच शटलसेवा सुरू करण्यात आली होती. माथेरान रेल्वे स्थानकात लोको शेडचे सुरू असलेले कामही थंडावले आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासनाला माथेरान मिनीट्रेनचे गांभीर्य दिसत नसल्याचे स्थानिकांचे मत आहे. पुन्हा जर का घाटमार्गात काही दरड पडल्यास त्याचा फटका शटलसेवेला सोसावा लागणार आहे, त्यामुळे येथील लोकोशेडचे काम होणे ही माथेरानसाठी काळाची गरज आहे. नेरळ-माथेरान रेल्वेसेवा हे पर्यटकांचे खास आकर्षण असल्याने ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी मागणी माथेरानमधून होत आहे.