कोर्लई किल्ल्यावर ६ तोफांना बसवले तोफगाडे, गतवैभव परत मिळवण्यासाठी प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 02:23 AM2019-05-05T02:23:35+5:302019-05-05T02:24:11+5:30
रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्ल्यावरील सहा तोफांना सागवानी लाकडी तोफगाडे बसवून त्यांचे लोकार्पण करण्यात आले, यामुळे तोफांना संजीवनी मिळाली आहे.
कर्जत - रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्ल्यावरील सहा तोफांना सागवानी लाकडी तोफगाडे बसवून त्यांचे लोकार्पण करण्यात आले, यामुळे तोफांना संजीवनी मिळाली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर संवर्धनाचे काम करत आहे. संस्थेने महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर ७५० हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा राबविल्या असून, १७०० दुर्गदर्शन घेतले आहेत. यातील काही मोहिमा या केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभाग आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या अख्यत्यारीतील किल्ल्यांवरही घेतल्या आहेत.
कोर्लई किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या पेण विभागाने सहा तोफांना पुरातत्त्व निकषाने लाकडी तोफगाडे बसवले आहेत. सध्या कोर्लई किल्ल्यावर एकूण २४ तोफा असून, या तोफा पोर्तुगीज बनावटीच्या आहेत. गडावरील सहा तोफांना हे तोफगाडे बसविण्यात आले असून, त्या जवळपास सहा फूट ते साडेसात फूट लांबीच्या आहेत. त्यातील दोन तोफा या हॉट डॉग (तोफेच्या मागच्या बाजूला कुत्र्याच्या तोंडासारखे मुखवटे) प्रकारात मोडतात. कोर्लई किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान व केंद्र पुरातत्त्व विभागाच्या संयुक्त विद्यमाने संवर्धनाचे काम सुरू आहे. तोफांना गतवैभव प्राप्त व्हावे आणि इतिहास जपला जावा, या उद्देशाने हे तोफगाडे जोडले गेल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
तोफगाडा लोकार्पणाची सुरुवात बुधवारी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोर्लई गावातून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणुकीने झाली. त्यानंतर शाहीर वैभव घरत यांच्या पोवाड्याचा कार्यक्र म झाला. किल्ल्यावरील तोफांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, या वेळी गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत अनेक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोथळीगड आणि राजगड या किल्ल्याला सागवानी दरवाजे बसविण्यात येतील. याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत असलेला संस्थेचे विविध विभागाकडून दुर्गसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. दर रविवारी दुर्गसंवर्धन घेतले जात आहे.
- गणेश रघुवीर, अध्यक्ष, दुर्ग संवर्धन विभाग
लोकवर्गणीतून तोफगाडे बसविण्यात येणार
सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड, कोथळीगड, कुलाबा किल्ला, वेतालवाडी किल्ला आणि आता कोर्लई किल्ल्यावर असे १२ तोफांना तोफगाडे बसविण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांत पद्मदुर्ग किल्ला चार तोफा, उंदेरी किल्ला सहा तोफा, औसा किल्ला दोन तोफा, रसाळगड किल्ला सहा तोफगाडे, खांदेरी किल्ला सहा तोफा, रत्नदुर्ग दोन तोफा अशा प्रकारे २६ तोफांना लोकवर्गणीतून तोफगाडे बसविण्यात येणार आहेत.