कर्जत : माथेरान हे पर्यटनस्थळ असल्यामुळे पर्यटकांच्या सेवेसाठी व्यापारी कार्यरत असतात. येथील व्यापाऱ्यांना आर्थिक देवाण - घेवाण करण्यासाठी येथील एकमेव असलेल्या युनियन बँक या राष्ट्रीयीकृत बँकेचा आधार घ्यावा लागतो; मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील व्यापाºयांना युनियन बँकेच्या गलथान कारभारामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे येथील व्यापाºयांनी युनियन बँकेला निवेदन देऊन बँक सुस्थितीत चालू ठेवावी; अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा सज्जड इशारा दिला.
माथेरान व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राजेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी मंडळाच्या शिष्टमंडळाने युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक उत्तम बनसोडे यांची भेट घेतली. यामध्ये नेटवर्क नाही, सर्व्हर बंद आहे, प्रिंटर काम करीत नाही, शनिवार, रविवारी एटीएममध्ये पैसे नसतात, फाटलेल्या नोटा घेत नाही अशी कारणे पुढे केली जातात. त्यामुळे व्यापाºयांना त्रासाला सामोरे जावे लागते. याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. त्यामुळे बँकेविरोधात आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा व्यापारी फेडरेशन अध्यक्ष राजेश चौधरी यांनीदिला.
याप्रसंगी निवेदन देताना प्रमोद नायक, अरविंद शेलार, मुस्तफा ताहेर, यतीश तावडे, राजन धोमकर, नितीन शाह, नटवर खेर आदी उपस्थित होते. या वेळी बँकेमध्ये मी रुजू झाल्यापासून या बँकेकडून ग्राहकांना कमीतकमी त्रास होईल याकडे माझा कल आहे, असे येथील शाखा व्यवस्थापक उत्तम बनसोडे यांनी सांगितले.