जिल्ह्यातील खारेपाटात गौराई नाचविण्याची ‘शतकी’ परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 04:25 AM2018-09-16T04:25:50+5:302018-09-16T04:26:08+5:30

सौभाग्याच्या रक्षणासाठी गौरीपूजन; महालक्ष्मीच्या सोहळ्याचा अनोखा उत्साह

The tradition of 'Gauri dancing' in Kharap in the district is 'Shatki' tradition | जिल्ह्यातील खारेपाटात गौराई नाचविण्याची ‘शतकी’ परंपरा

जिल्ह्यातील खारेपाटात गौराई नाचविण्याची ‘शतकी’ परंपरा

Next

- जयंत धुळप 

अलिबाग : गौरीचे पूजन केल्यास आपल्या हिरव्या चुड्याचे अर्थात सौभाग्याचे संरक्षण होते, अशी दृढश्रद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे. रायगड जिल्ह्यातील पेणमधील खारेपाटात विशेषत: वाशी, वढाव, भाल, पेण फणसडोंगरी, खारसपोली या भागात गौराई डोक्यावर नाचवण्याची परंपरा सुमारे १०० वर्षांपेक्षा जुनी असल्याची माहिती, ग्रामीण रूढी-परंपरांचे अभ्यासक पेण तालुक्याच्या खारेपाटातील वढाव येथील देवीदास म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली.
गौराई डोक्यावर घेऊन नाचवण्याची ही अनोखी पंरपरा आजही आबाधित आहे. भाद्रपद शुद्ध षष्ठीच्या दिवशी गौरींचे अर्थात खारेपाटात गौरार्ईचे स्वागत शनिवारी पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. गौराईची कथा मोठी रोचक अशीच आहे. एकदा कौलासुर नावाच्या राक्षसांने स्त्रियांना त्रास द्यायला सुरुवात केली. सगळ्या स्त्रिया ब्रम्हा, विष्णू, महेशाकडे गेल्या. त्यांनी कौलासुराच्या त्रासाचा पाढाच वाचला. स्त्रिया महालक्ष्मीला शरण गेल्या. देवीने त्यांना धीर दिला. महालक्ष्मीने कौलासुराचा नाश केला, तेव्हापासून ‘गौर’ म्हणजेच महालक्ष्मीचा सोहळा गणेशोत्सवात साजरा केला जातो.
माहेर आणि सासरला जोडून ठेवणारा हा गौराईचा सण नव्हे, तर संस्कार असल्याची धारणा खारेपाटात आहे. पारंपरिक गाणी गौरीच्या आगमनाच्या रात्री खारेपाटात घराघरांत घुमत असतात. खारेपाटातील भाल येथील सरोज अशोक म्हात्रे, वढाव येथील शकुंतला गजानन म्हात्रे, खारसपोलीमधील हरिश्चंद्र म्हात्रे, गौर फणस डोंगरी-पेण येथील रंजना राम म्हात्रे, वाशी येथील माहेरवाशीण संगीता पाटील या सर्व जणी एक ते दीड किलोमीटरचे अंतर पाटाला हात न लावता, भजनात नाचत गौर विसर्जनाकरिता घेऊन जातात.

उरणसह तालुक्यात केवडा झाला दुर्मीळ
उरण : उरण परिसरातील समुद्रकिनारेच पार उद्ध्वस्त झाल्याने किनाऱ्यावर असलेली केवड्याची वनेही नष्ट झाली आहेत. गणपतीला केवडा अत्यंत प्रिय आहे. मात्र, आता हा मनमोहक सुगंध देणारा केवडा उरण परिसरात दुर्मीळ झाल्याचे दिसून येत आहे. उरण परिसरातील घारापुरी, केगाव-दांडा, पीरवाडी ते करंजा परिसरातील विविध सागरीकिनाºयांवर ठरावीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात केवड्याची वने आढळून येतात.
केवडा श्रावण, भाद्रपद महिन्यातच फुलतो, बहरतो. गणेशोत्सवात केवड्याला विशेष महत्त्व आहे. केवड्याला केतकी, ताझम फू , धुली पुष्पम, अशी इतर अनेक नावे आहेत. केवड्याच्या फुलांचा सुवासिक अत्तर आणि तेल बनविण्यासाठीही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. झाडांची मुळे, पाने, खोडापासून मॅट बनविण्यासाठी, औषधे बनविण्यासाठी वापर केला जातो. गणेशपूजनात केवड्याला विशेष महत्त्व असल्याने भक्तांकडून सध्या मोठी मागणी आहे.
देशातील काही भागांत केवड्याच्या झाडांची लागवडही केली जाते. उरण परिसरात समुद्रकिनारपट्टीची दिवसेंदिवस प्रचंड धूप होत चालली आहे. केवड्याचे फूल गणेशाला वाहण्यासाठी भक्त उत्सुक असतात. याशिवाय केवड्याच्या पातीलाही विशेष मागणी असते. मात्र, केवड्याची वने नामशेष होत असल्याने केवडा दुर्मीळ झाला आहे.

गौराईच्या आगमनाने उत्साह द्विगुणित
पेण : ‘बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला...’ श्री गणेशाच्या आगमनाने भाद्रपदातील हा आनंद सोहळ्यातील परमोच्च क्षण म्हणजे गौरीचे आगमन.
रांगोळ्या, घराची सजावट, गौराईच्या मखराची आरास, तिला नटवणे, प्रसादाचे, गोडाधोडाचा नैवेद्य करून गौराईचे स्वागत केले जाते. गौराईच्या आगमनाने घरात वेगळाच उत्साह संचारतो.
पूर्वी गौरीचे स्वागत पारंपरिक गाणी गाऊन केले जायचे. त्यानंतर झिम्मा फुगड्या, उखाणे, पारंपरिक खेळ खेळले जायचे. मात्र, काळानुरूप गाणी बदलली असली, तरी गौराईच्या आगमनाचा उत्साह आजही कायम आहे.
 

Web Title: The tradition of 'Gauri dancing' in Kharap in the district is 'Shatki' tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.