बालगोपाळांमध्ये इतिहास जागवणारी किल्ल्यांची परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 04:30 AM2018-11-06T04:30:44+5:302018-11-06T04:30:59+5:30
- जयंत धुळप अलिबाग - दिवाळीमध्ये किल्ले बांधण्याची परंपरा प्राचीन आहे. नवी पिढी इतिहास विसरते आहे असा केला जाणारा ...
- जयंत धुळप
अलिबाग - दिवाळीमध्ये किल्ले बांधण्याची परंपरा प्राचीन आहे. नवी पिढी इतिहास विसरते आहे असा केला जाणारा दावा या बालगोपाळांनी जोपासलेल्या दिवाळी किल्ले परंपरेने फोल ठरविला आहे. दिवाळीतील किल्ले बांधण्याकरिता बालगोपाळ छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक पराक्रम अनाहूतपणे जाणून घेत आहेत. हिंदवी स्वराज्य लढ्यातील मावळ््यांपासून आजच्या सैन्यातील सैनिकांपर्यंतच्या संरक्षण व्यवस्थेचे त्यांना आकलन होत असते. स्थापत्य शास्त्राचा प्राथमिक अभ्यास किल्ल्यांमुळे या बालगोपाळांचा लहान वयातच होतो हे नाकारता येणार नाही.
राजस्थानची परंपरा महाराष्ट्रात रुजली
दिवाळीच्या शेवटच्या दिवशी राजांकडून फटाक्यांची आतषबाजी होत असे.
त्यावेळी या किल्ल्याच्या प्रतिकृतींमध्ये फटाके लावून या प्रतिकृती उद्ध्वस्त केल्या जात असत. शत्रूचा हा मुलूख जिंकताना आपल्या सैन्याने दिलेला लढा राज्यातील प्रजेला कळावा असा उद्देश यामागे असायचा. राजस्थानात आजही हा प्रघात पाळला जातो. राजस्थानची ही परंपरा शिवरायांच्या काळात महाराष्ट्रात रुजली.
राजस्थानमध्ये जन्माला आली परंपरा
दिवाळीमध्ये किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याचा प्रारंभ सर्व प्रथम राजस्थानमध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज राजस्थानचे असल्याने, कालांतराने ही स्फूर्तिदायी परंपरा महाराष्ट्रात आली आणि पक्की रु जली. शत्रूच्या ताब्यातून जिंकलेले मुलुख प्रत्येकाला पाहणे शक्य नसल्याने राजस्थानातील राजे दिवाळीपूर्वी त्या मुलुखातल्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार करीत असत. त्याकाळी राजस्थानातील जनतेकरिता या किल्ल्याच्या प्रतिकृती पाहण्यास जाणे मोठ्या औत्सुक्याचे आणि तितकेच आनंददायी असे.
शाळा, संस्थांमध्ये स्पर्धेचे आयोजन
आजच्या पिढीला टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाइल यांच्या मायाजालातून थोडेसे बाजूला काढून छत्रपती शिवरायांचा अनन्यसाधारण इतिहास लक्षात आणून द्यावा, छत्रपती आणि त्यांच्या मावळ्यांनी दिलेला लढा त्यांच्यासमोर यावा, ही त्यामागील अपेक्षा आहे. पुरातन स्थापत्यशास्त्राची माहिती मुलांना व्हावी या हेतूने कुरूळ गावातील सु.ए.सो. शाळा व सृजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांच्या कल्पकतेतून शाळेच्या वतीने ‘दिवाळी किल्ला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.