आधुनिक जीवनशैलीतही पारंपरिक कला जिवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:42 PM2019-04-10T23:42:30+5:302019-04-10T23:42:39+5:30
उन्हाळ्यात आजही माठांना मागणी : बोटावर मोजण्याएवढेच कुं भार व्यावसायिक; नवीन पिढी शिक्षण, नोकरीच्या मागे
सिकंदर अनवारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या की डोळ्यासमोर येतो तो मातीचा माठ. हे मातीचे माठ बनवणारे पारंपरिक व्यावसायिक आता फारच कमी शिल्लक राहिले आहेत. माणसाने आधुनिक जीवनशैली आत्मसात केली असली तरी पारंपरिक कला जोपासत आजही वयोवृद्ध माणसे माठ बनवण्यात गुंतले आहेत. माठ बनवण्याच्या कलेत आता केवळ जुनीच पिढी शिल्लक राहिली आहे. नवीन पिढी शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागली आहे. यामुळे आता केवळ बोटावर मोजण्याइतकेच कुं भारव्यावसायिक दिसून येत आहेत.
गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठाला ग्रामीण तसेच शहरी भागात ऐन उन्हाळ्यात मागणी असते. काळाच्या ओघात आधुनिक यंत्रे आली आणि पारंपरिक पद्धती मागे पडू लागल्या. त्याचप्रमाणे फ्रीजमुळे या मातीच्या माठांची मागणी घटली आहे. असे असले तरी ग्रामीण भागात आजही कुंभार समाजातील अनेकांनी आपली ही कला जपण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. ऐन उन्हाळ्यात या मातीच्या माठातील पाणी फायदेशीर असते. हे पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड ठेवण्याचे काम मातीच्या माठाद्वारे होते. आरोग्याला लाभदायक असलेल्या माठातील पाणी पिण्यासाठी आजदेखील अनेक घरात माठ आवर्जून आणला जातो. काळाच्या ओघात ही कला आता मागे पडू लागली आहे. याकरिता लागणारी माती जरी मोफत असली तरी अन्य साहित्य मात्र विकत घेऊनच माठ तयार करावे लागत आहेत.
मातीच्या माठाची मागणी घटली आहे, यामुळे त्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासारखी स्थिती राहिली नसल्याने या समाजातील नवी पिढी मात्र या व्यवसायातून बाहेर पडली आहे. नव्या पिढीने शिक्षण, नोकरी आणि अन्य व्यवसायाकडे पावले उचलली आहेत. यामुळे जुन्या पिढीतील वयोवृद्ध माणसेच आता माठ, मातीच्या चुली, घराची कौले बनवण्याची कामे करीत आहेत. महाड तालुक्यात महाड शहर, बिरवाडी, दासगाव आदी गावातून माठ बनवले जात होते. शहरातील हा व्यवसाय आता दिसेनासा झाला असून बिरवाडी येथील कुंभारवाडा येथे जवळपास ८० घरांमधून केवळ सात ते आठ घरांतूनच ही कला जपली जात असल्याचे येथील अनिता दगडू सावादकर यांनी सांगितले.
दिवसा तयार होतात
फक्त दहा मटके
च्महाड तसेच बिरवाडीमध्ये औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे जमिनी शिल्लक राहिलेल्या नाहीत.
यामुळे अनेकांना मातीदेखील विकत घ्यावी लागत आहे. मातीपासून माठ बनवताना चाकाचा वापर केला जात नाही. ही मातीदेखील पायाने तुडवण्यास दोन तास जातात.
च्मडक्याच्या आकाराच्या साच्यावर माती थापून त्याला हाताने आकार देत मडके बनवण्याची कला अवघड आहे. त्यानंतर हे कच्चे मडके भट्टीत टाकले जाते. यामध्ये अनेक वेळा नुकसानदेखील सहन करावे लागत असल्याचे बिरवाडी कुंभारवाडी येथील दगडू सावादकर यांनी सांगितले.
च्कच्च्या मडक्याला तडे जाणे, भट्टीत फुटणे किंवा अवेळी पाऊस यामध्ये हे नुकसान होते. या प्रक्रियेला किमान दोन दिवस जातात. साच्यावर एक मडके बनवण्यास एक तास लागतो. दिवसाला दहा मडकी तयार होतात.
आमची नवी पिढी या व्यवसायात शिल्लक राहिली नाही. मेहनत, खर्च अधिक असून मातीच्या माठाची मागणीदेखील कमी झाली आहे. माठ आणि चुली बनवताना आपली कला जपण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतो.
- अनिता दगडू सावादकर, कुंभार