वडखळ-अलिबाग मार्गाची चाळण, दुचाकीस्वारांचे होताहेत अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:34 AM2019-09-21T00:34:48+5:302019-09-21T00:34:53+5:30
वडखळ-अलिबाग महामार्गावरील पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत.
कार्लेखिंड : वडखळ-अलिबाग महामार्गावरील पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या मार्गावर ठरावीक ठिकाणी मोठे आणि खोल खड्डे पडलेले आहेत; परंतु या खड्ड्यांचे रूप भयंकर आहे. वडखळपासून धरमतर चेकपोस्ट, धरमतर पुलाच्या अलीकडे, पळी, तीनवीरा या ठिकाणी खड्डे तीव्र स्वरूपाचे आहेत. या खड्ड्यांमध्ये दिवसाला एखादी चारचाकी बंद पडते तर एखादा दुचाकीस्वार पडून अपघाताची साखळी सुरू आहे. सध्या पाऊस पडत आहे, त्यामुळे पाण्याने खड्डे भरले की, वाहनचालकाला या खड्ड्यांचा अंदाज येत नाही.
पळी या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत, असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तर धरतमर विभागात रस्त्यालगत मातीचे भराव केले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न केल्यामुळे या रस्त्यावरच अर्धा ते एक फूट पाणी साचत आहे, तर काही ठिकाणी रस्त्याची साइडपट्टीची माती वाहून जाऊन भगदाडे पडली आहेत. हे खड्डे पावसाच्या सुरुवातीपासून पडलेले आहेत. त्यामध्ये एखादे वेळेस खडी, माती टाकली, त्यानंतर या खड्ड्यांकडे संबंधित विभागाचे अक्षरश: दुर्लक्षच आहे आणि याचा त्रास प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सहन करावा लागत आहे.
याच महामार्गावरील कार्लेखिंड घाटात अलिबागहून पेणकडे येताना पात्रुबाई मंदिरापासूनच्या पहिल्या वळणावर रस्त्याचा कठडा २०-२५ फूट खोल कोसळला आहे. अवजड वाहने जाऊन येथील भाग खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही घडलेली घटना संबंधित विभागाच्या लक्षात आणूनसुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकरची सुरक्षा व्यवस्था अथवा सूचना फलक लावलेले नाहीत. यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे.