महामार्गावर वाहतूककोंडी, महामार्गावर वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 01:03 AM2019-09-01T01:03:03+5:302019-09-01T01:03:28+5:30

कोकणात ३० हजार वाहने रवाना । अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावर बंदी

Traffic congestion on the highway, mumbai traffice | महामार्गावर वाहतूककोंडी, महामार्गावर वाहनांच्या रांगा

महामार्गावर वाहतूककोंडी, महामार्गावर वाहनांच्या रांगा

googlenewsNext

पनवेल/ नवी मुंबई : गणेशोत्सवामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे मुंबई-गोवा व मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी वाहतूककोंडी झाली होती. गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली असून, २४ तास बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन दिवसांमध्ये या मार्गावरून उत्सवासाठी ३० हजार खासगी व एसटी बसेससह इतर वाहने गेल्याची नोंद झाली आहे.

पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेमध्ये व निर्विघ्नपणे पार पाडता यावा, यासाठी महापालिकेसह पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उत्सवासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे व कोकणातील तीनही जिल्ह्यांमध्ये लाखो भाविक जात आहेत. एसटी महामंडळाने जादा बसेस उपलब्ध केल्या असून, खासगी बसेसही मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र व कोकणात जाणार आहेत. वाहनांची संख्या नेहमीपेक्षा पाचपट वाढणार असल्यामुळे मुंबई-गोवा व मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. अवजड वाहनांना २ सप्टेंबरपर्यंत गोवा महामार्गावर जाण्यास मज्जाव केला आहे. कळंबोली, पळस्पे फाटासह गोवा महामार्गाकडे जाणाºया सर्व नाक्यावर २४ तास कर्मचारी तैनात केले आहेत. ३० व ३१ सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये गोवा महामार्गावरून कोकणाकडे तब्बल ३० हजार एसटी व खासगी बसेस व कार गणपतीसाठी गेले आहेत. नियमित कोकणाकडे रोज अडीच हजार वाहने जात असतात. अचानक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे महामार्गावर कळंबोली व पळस्पे जवळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. पावसाचे पाणीही रोडवर साचल्याने वाहतूककोंडीमध्ये भर पडली होती. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना धावपळ करावी लागत होती.

दोन्ही महामार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोमवारी पहाटेपर्यंत गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गावाकडे जाणार आहेत. यामुळे पोलिसांनी वाशी, सानपाडा, नेरुळ, सीबीडी, खारघर, कळंबोली, पळस्पे परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी सातत्याने रोडवर राहतील, अशी व्यवस्था केली आहे. यासाठी काही ठिकाणी निवारा शेडही तयार केले आहेत. या व्यतिरिक्त शहरातील बंदोबस्तामध्येही वाढ करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये १९२ पेक्षा जास्त सार्वजनिक ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. पनवेल व उरण परिसरामध्येही १०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणपती असणार आहेत. ३० हजारांपेक्षा जास्त घरांमध्ये गणरायाचे आगमन होणार आहे. पोलिसांनी आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. विसर्जन तलावांवरही सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात केला आहे. गणेशोत्सव मंडळांना व नागरिकांनाही सुरक्षेसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

महामार्गावर वाहनांच्या रांगा
वाशी ते सीबीडीदरम्यान महामार्गावर फारशी वाहतूककोंडी झाली नाही; परंतु पनवेल परिसरामध्ये कळंबोली, पळस्पे व इतर ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. रोड खराब असल्यामुळे व अचानक झालेल्या पावसाने पाणी साचल्यामुळे पनवेल परिसरामध्ये वाहतूककोंडीमध्ये वाढ झाली होती. पळस्पेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी रोडवर आल्यामुळेही वाहतुकीवर परिणाम झाला होता.

सायन-पनवेल व मुंबई-गोवा महामार्गावर २४ तास बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मार्गावर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. अवजड वाहनांना गोवा महामार्गावर बंदी करण्यात आली असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
- सुनील लोखंडे, वाहतूक पोलीस उपआयुक्त

गणेशोत्सवासाठीची जय्यत तयारी
मुंबई-गोवा व मुंबई-पुणे महामार्गावर २४ तास पोलीस बंदोबस्त
मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी
वाशी, सानपाडा, नेरुळ, सीबीडी, कळंबोली, खारघर, पळस्पेमध्ये विशेष बंदोबस्त
वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक मनुष्यबळ महामार्गावर तैनात
शहरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुरक्षेसाठी सूचना
सार्वजनिक गणेशोत्सव परिसरावरही कॅमेऱ्यांची नजर
साध्या वेशातील पोलिसांची गस्तही वाढविली
घातपाती होऊ नये यासाठी विशेष खबरदारीची सुरुवात

महाड तालुक्यातील केंबुर्ली गावाजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दुपारी तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. अपघातानंतर महामार्ग जवळपास दीड तास ठप्प झाल्याने पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रवासात प्रचंड हाल झाले.

Web Title: Traffic congestion on the highway, mumbai traffice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.