पेण : मंगळवारी रात्रीपासून पेण परिसरात धुवाँधार पाऊस सुरू आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. परिणामी पावसामुळे पाणी साचून महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे. पेण शहरानजीकच्या तरणखोप (पेण बायपास) ते रामवाडी (बसस्थानक) पर्यंतचा ६ किमीच्या टप्प्यात वाहनांची भलीमोठी लांबच लांब रांग बुधवारी सकाळपासून महामार्गावर लागलेली आहे. रामवाडी ते पेण हा एक किमीचा अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड तासाचा कालावधी लागत होता. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी वर्ग व विद्यार्थी यांना महामार्गावरच वाहनातून उतरून आपापल्या कामाच्या ठिकाणी व शाळा ठिकाणी जावे लागत आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशी दयनीय अवस्था राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे झालेली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न पावसाळ्यात डोकेदुखी ठरणार आहे.
बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून रामवाडी बसस्थानकापासून पेण रेल्वे स्थानक, अंतोरा फाटा आणि त्यापुढे तरणखोप गावापर्यंतच्या पेण-खोपोली बायपास रस्त्यापर्यंत महामार्ग जाम झालेला होता. जोरदार पडणारा पाऊस महामार्गावर साचलेले पावसाचे पाणी आणि त्या पाण्याखाली असलेले खड्डे याचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने वाहने आदळून नुकसान होत आहे. महामार्गाचे तिन्ही मार्ग वाहनांनी भरलेले असल्याने पाच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या पेण शहरात प्रवेश करताना तब्बल तास दीड तासाचा कालावधी लागत होता. सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहून आलेल्या वाहनातून उतरून महामार्गावरच पायी चालत आपला मोर्चा शाळांकडे वळवला. कामानिमित्त आलेल्या नोकरदार वर्ग व्यावसायिक मजूर यांनी सुद्धा या प्रकारची दखल घेत चक्क गाड्या सोडून महामार्गावर चालत पेण शहर गाठले. पेण शहरातील अंतर्गत रस्त्यामध्ये सुद्धा या महामार्गावरील कोंडीचा फ टका बसला. एकंदर आजची वाहतूककोंडी नागरिकांना व प्रवासी वर्गाला मनस्ताप देणारे ठरली, तर बाहेरच्या प्रवासी वाहनांना सुद्धा याचा फटका बसला.