राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: मुंबई गोवा महामार्गावर तरण खोप ते वडखळ दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर पडलेले खड्डे, सुरू असलेली कामे, त्यात अवघड वाहतूक या समस्येमुळे या मार्गावर रोजच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी, रविवार सुट्टी आल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक ही येऊ लागल्याने वाहतूक कोंडीत अडकले आहेत. वाहतूक सुरळीत करताना मात्र पोलिसांची कसरत होत आहे.
मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सव पूर्वी एक लेन पूर्ण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पेण पुल ते वाशी या ठिकाणी ठेकेदार याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे खड्डेही मोठ्या प्रमाणात पडले आहेत. त्यामुळे खड्डे चुकवत वाहन चालकाला रस्त्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्यात अवजड वाहतूक ही सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तरण खोप ते वाशी नाका येथ पर्यंत वाहनाच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची मात्र दमछाक होत आहे.