बिरवाडी : चार दिवसांपूर्वी बिरवाडी शहरातील मच्छी मार्केटजवळील पुलाला भगदाड पडले होते. तो पूल दुरुस्तीपूर्वीच नागरिकांच्या रहदारीकरिता खुला करण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजी चौक येथील पुलाला मोठे भगदाड पडल्याची घटना २ आॅक्टोबरला घडली होती. बिरवाडी बाजारपेठेमध्ये ये - जा करण्याकरिता नागरिक व वाहनचालक याच पुलावरून जात असतात. भगदाड पडल्यानंतर बंद करण्यात आलेली वाहतूक ग्रामपंचायतीने कोणतीही धोक्याची सूचना न देता अथवा दुरुस्ती न करताच पूल खुला केल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धोकादायक पुलावरून विद्यार्थी व मोटारसायकल वाहनांची ये - जा सुरू आहे. त्यातच या मार्गावर पुलाला पडलेल्या मोठ्या भगदाडीबाबतच्या सूचनाफलक अथवा धोक्याची सूचना देण्यात आलेली नाही. हा पूल रहदारीकरिता खुला केल्याने या ठिकाणी एखादी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नीलेश धारिया यांनी व्यक्त केली आहे. पुलाला भगदाड पडल्यानंतर तत्काळ बंद करण्यात आलेला पूल ग्रामपंचायतीने कोणतीही पूर्वसूचना अथवा दुरुस्ती न करताच रहदारीकरिता खुला केल्याने या ठिकाणी घडणाऱ्या दुर्घटनेस संबंधितांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी व दुरुस्ती होईपर्यंत हा पूल रहदारीकरिता खुला करण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नीलेश धारिया यांनी केली आहे. (वार्ताहर)
धोकादायक पुलावरून वाहतूक
By admin | Published: October 12, 2015 4:49 AM