- मयूर तांबडेपनवेल : गाढी नदीवर असलेला देवद गाव ते नवीन पनवेल हा पूल धोकादायक असूनही या पुलावरून वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. वाहनांना बंदी असूनदेखील दुचाकीची वाहतूक सुरू असल्याने अपघात झाल्यास कोणाला जबाबदार धरणार? असा सवाल उपस्थित झालेला आहे. सद्यस्थितीत धोकादायक झालेला हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबई महापालिकेद्वारे मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गाढी नदीवर छोटासा पूल बांधण्यात आलेला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून याच पुलावरून चारचाकी व दुचाकी वाहनांतून प्रवास केला जात आहे. गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या गृहसंकुलांमुळे मोठ्या प्रमाणात येथील रहिवासी संख्या वाढली आहे. येथे गाड्या वाढल्या, वर्दळही वाढली आहे. या पुलावरून अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांची रहदारी सुरू आहे. देवद गाव ते नवीन पनवेल यांना जोडणाऱ्या गाढी नदीवरील पुलास तीन कोटी रु पयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी २२ नोव्हेंबर रोजी मंजूर केला आहे. यामुळे हजारो नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. देवद परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गावांची शहरे होऊन अनेक वर्षे उलटली, तरी देवद गावात जाणारा मार्ग अरुंदच आहे. हा पूल धोकादायक झाल्याने नवी मुंबई महापालिकेकडून फलक व बांध घालून बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, याला न जुमानता मोठ्या प्रमाणावर दुचाकी या पुलावरून ये-जा करत आहेत. गाढी नदीला पाणी कमी झाल्यामुळे देवद गावात जाण्यासाठी नदीतून रस्ता बनविण्यात आलेला आहे, असे असले तरीदेखील दुचाकी या धोकादायक पुलावरून ये-जा करत आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बांधण्यात आलेल्या या पुलाला अनेक ठिकाणी तडे गेल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नवीन पूल बांधण्याची मागणी केली होती. आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार विवेक पाटील यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. अरुंद व धोकादायक पुलामुळे देवद परिसरातील नागरिकांना प्रवासात मोठा अडथळा होता. या देवद पुलासाठी तीन कोटी मंजूर झालेले आहेत, त्यामुळे लवकरच या कामाला सुरु वात होईल. देवदवासीयांची एवढ्या वर्षांपासून सुरू असलेली फरफट दूर होईल.
गाढी नदीवरील धोकादायक देवद पुलावरून वाहतूक सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:29 AM