जमीर काझी, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: मान्सूनच्या जोरदार पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गांवर महाड तालुक्यातील केभुर्ली जवळ रविवारी पहाटे दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झालेली नाही . मात्र त्यामुळे मार्गावरील वाहतूक काही तास विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबवर रांगा थांबून राहिल्या. महामार्ग वाहतूक व स्थानिक पोलिसांनी दरड बाजूला करून मार्ग मोकळा केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
शुक्रवार मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मान्सूनचा तडाक्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे मात्र जोरदार हवा व गडगटासह पाऊस कोसळत असल्याने दरड कोसळण्याचे घटनाही सुरुवात झाली आहे. रविवार पहाटे महाड तालुक्यात रत्नागिरी कडे जाणाऱ्या मार्गांवर रस्त्यालगत दरड कोसळली. त्यामुळे वाहतुक खोळंबून राहिली. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. काही वेळात महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी तेथे धाव घेतली. दरड एका बाजूला करून महामार्ग मोकळा केला व वाहतुक पुन्हा सुरु करण्यात आली.