रोहा : रोह्यातील मध्य रेल्वेच्या मार्गावर धावणारी रोहा-मुंबई मालगाडी गुरुवारी सकाळी पडम नाका येथील फाट्यावर तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली. त्यामुळे रोह्यावरून अलिबाग, नागोठणे, मुंबई, पनवेलकडे जाणारी व येणारी वाहतूक तब्बल तीन तास ठप्प होती. ही घटना नेमकी रेल्वे फाटकावर घडल्याने अनेकांना वाहतुकीचा फटका बसला, तसेच रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली.रोहा रेल्वेस्थानकातून गुुरुवारी सकाळी ८.२०च्या सुमारास मुंबईच्या दिशेने मालगाडी रवाना झाली. रोहा स्थानकापासून तीन कि.मी. अंतरावर पडम फाटकात मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने ती बंद पडली, त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वे व विविध वाहनांतील प्रवासी, विद्यार्थी, कामगारवर्गाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. सिंगल पटरीवरील रेल्वेमार्ग तीन तास ठप्प झाल्याने पनवेल ते रोहा मध्य रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या दुपदरीमार्गावर ताण पडला. मुंबई येथील सीएसटीवरून गोवा राज्यातील मडगाव येथे रवाना होणारी मांडवी एक्स्प्रेस, सिंधुदुर्गात जाणारी दिवा - सावंतवाडी व १०.३० वा. कोकणात जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या.पडम नाक्यावर दोन्ही बाजूकडे एसटी, टेम्पो, जीप व अन्य अवजड वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. वाहतूक नियंत्रणासाठी रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पडम-खारापटी ग्रामस्थांसाठी असलेल्या बायपास मार्गावरून दुचाकी व लहान वाहनांची येण्या-जाण्याची व्यवस्था करण्यात आली.सकाळी ८.३० ते ११ वा.पर्यंत रेल्वे प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. अखेर पनवेलवरून दुसरे इंजिन आल्यावर ११.४५च्या दरम्यान रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याने तीन तास ताटकळत बसलेल्या रेल्वे व अन्य वाहनांतील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाडतीन तास वाहतूक ठप्प; रेल्वे प्रशासनाची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 3:19 AM