जेएनपीएच्या खासगी जीटीआय बंदरातील इंट्रीगेट सिस्टीम कोलमडल्याने परिसरातील आठ तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2022 09:57 PM2022-12-23T21:57:30+5:302022-12-23T22:06:20+5:30
वाहतूक कोंडीमुळे रस्ते, उड्डाणपूलावर वाहनांच्या सात किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा !
- मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीए अंतर्गत असलेल्या जीटीआय या एका खाजगी बंदराची इंट्रीगेट सिस्टीम बंद पडल्याने जेएनपीए परिसरातील रस्ते, उड्डाणपूलावर शुक्रवारी सकाळपासूनच परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे परिसरात सुमारे सहा-सात किमी पर्यंत कंटेनर ट्रेलरच्या रांगा लागल्या होत्या.
जेएनपीए अंतर्गत पाच खासगी बंदरे आहेत.ही पाचही बंदरे जेएनपीएने खासगीकरणातून चालविण्यासाठी दिली आहेत.शुक्रवारी (२३) जीटीआय बंदरातील इंट्रीगेट सिस्टीम बंद पडली. कंटेनर तपासणीची यंत्रणाच कोलमडल्याने बंदरातील कंटेनर वाहतूक पुरती बंद पडली.यामुळे मात्र जेएनपीए परिसरातील सर्वच रस्त्यांवर कंटेनर ट्रेलर जागा मिळेल त्या ठिकाणी पार्किंग करून ठेवण्यात आले होते.या अवैध कंटेनर ट्रेलरच्या पार्किंगमुळे जेएनपीए परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
द्रोणागिरी ते चांदणी चौक,करळ आदी उड्डाण पूलांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.परिसरातील सहा-सात किमी अंतरापर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगांमुळे परिसरात वाहतूकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती. जेएनपीए अंतर्गत असलेल्या खासगी बंदरात तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. शुक्रवारी खासगी जीटीआय बंदरातील इंट्रीगेट सिस्टीम बंद पडली.यामुळे सकाळपासूनच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.वाहनाच्यांही ठिकठिकाणी रांगा लागल्या होत्या.मात्र संध्याकाळी पाच वाजता बंद पडलेली सिस्टीम पुर्ववत सुरू झाली.त्यानंतर वाहतूकही सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांनी दिली.