मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे वाहतूक कोंडी, चाकरमानी अडकले वाहतूक कोंडीत
By राजेश भोस्तेकर | Published: September 16, 2023 04:20 PM2023-09-16T16:20:44+5:302023-09-16T16:21:51+5:30
मुंबई गोवा महामार्गावर सकाळच्या सत्रात वाहतूक सुरळीत सुरू होती.
अलिबाग : गणेशोस्तव सणाला चाकरमानी गणेशभक्त हे मुंबईतून कोकणात जाण्यास निघाले आहेत. एकीकडे मुंबई गोवा महामार्गाचे असलेले अपूर्ण काम आणि दुसरीकडे वाहनांची वाढलेली संख्या यामुळे गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर सकाळच्या सत्रात वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र दुपारनंतर चाकरमानी हे आपल्या खाजगी वाहनाने गावी जाण्यास निघाले आहेत. माणगाव येथे दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लावून वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव बाजारपेठेतून हा महामार्ग जात असल्याने खरेदी साठी नागरिक बाजारात आले आहेत. तसेच गणेशोत्सव सणाला जाणाऱ्या गणेशभक्तांची वाहनेही वाढलेली आहेत. माणगाव मधून निजामपूर आणि श्रीवर्धनकडे जाणारे दोन बाह्य रस्ते असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
माणगाव येथेच वाहतूक कोंडीचा सामना सध्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यात अवजड वाहनेही सुरू होती. त्यामुळेही वाहतूक कोंडी होत होती. मात्र अवजड वाहतूक पोलिसांनी बंद केल्याने दिलासा मिळाला आहे. वाहतूक कोंडी झाली असल्याने प्रवाशांना एकाच ठिकाणी अर्धा, एक तास थांबावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत. सायंकाळी एस टी बसेस, खाजगी ट्रॅव्हल्स बसेस याची वाहतूक वाढली जाणार आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पेण, वाशी, इंदापूर, माणगाव, कशेडी घाट याठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.