गोवा महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

By admin | Published: June 20, 2017 06:11 AM2017-06-20T06:11:56+5:302017-06-20T06:11:56+5:30

पावसाला सुरुवात झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर झाडे कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. महामार्गालगत असलेली अनेक झाडे सुकलेली आहेत.

Traffic jam due to collapsing on the Goa highway | गोवा महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

गोवा महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव / महाड : पावसाला सुरुवात झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर झाडे कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. महामार्गालगत असलेली अनेक झाडे सुकलेली आहेत. तर काही जुनी झाली आहेत व काही झाडे वणव्यामुळे जळून तशीच उभी आहेत. दरवर्षी पावसाळ्यात ही झाडे महामार्गावर कोसळत असून, याचा फटका ये-जा करणाऱ्या प्रवाशांना बसतो. सोमवारी सकाळी १०.३० वाजता महाड तालुक्यातील वीर गावच्या हद्दीत एक भले मोठे झाड अचानक महामार्गावर कोसळले व संपूर्ण महामार्ग दोन्ही बाजूने एक तास ठप्प झाला होता.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. मात्र, मुंबई-गोवा महामार्गालगत जुनी झाडे आजही अस्तित्वात आहेत. जुनी झालेली झाडे, वणव्यामुळे जळालेली झाडे, तर वीज कोसळून सुकलेली झाडे आजही महामार्गालगत उभी असलेली दिसून येतात. ही झाडे दरवर्षी वादळी पावसामुळे महामार्गावर कोसळत असतात. पावसाळ्यापूर्वी या झाडांची तोड होणे गरजेचे आहे. मात्र, महामार्ग विभाग पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. याचा फटका मात्र दरवर्षी मुंबई-गोवा महामार्गाच्या वाहतुकीला बसतो.
सोमवारी महाड तालुक्यातील वीर गावच्या हद्दीत १०.३०च्या सुमारास अचानक जुने झालेले एक झाड महामार्गावर कोसळले. वित्त किंवा जीवितहानी झाली नसली, तरी याचा फटका महामार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीला बसला. तब्बल एक तास महामार्गावरची दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली. जवळच टोल फाटा येथे बंदोबस्तासाठी असलेले जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस नाईक नीतेश कोनडाळकर यांनी जेसीबी आणून प्रवासी, स्थानिकांच्या साहाय्याने एक तासाच्या प्रयत्नाने महामार्गावरील झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Traffic jam due to collapsing on the Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.