वैभव गायकर।लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : निसर्गाचे वरदान लाभलेल्या खारघर शहराची नवी मुंबईत वेगळी ओळख आहे. या ठिकाणच्या पर्वतरांगा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. सध्या खारघर शहरातील खाडीत देशी-विदेशी पक्ष्यांची रेलचेल पाहावयास मिळत आहेत. या पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी पक्षिप्रेमींची पावले खारघरमध्ये वळू लागली आहेत.
खारघर सेक्टर १५, १६ मधील वास्तुविहार सिडको सोसायटीच्या मागील बाजूस खाडी आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी विविध रंगी, आकर्षक पक्ष्यांचे थवे दिसू लागले आहेत आणि त्यांची छबी टिपण्यासाठी पक्षिप्रेमींमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे.नवी मुंबईचा विकास झपाट्याने होत असून, येथील पाणथळ नष्ट होत आहे. खारघर शहराच्या मागील बाजूस असलेले पाणथळ पक्ष्यांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. यंदाही पक्ष्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. यामध्ये विदेशी प्रजातीच्या स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. बगळे, चिमणी, घार, गरुड, किंगफिशर, राघू, सारस, दाबील, अडई, सरग्या, शेकाट्या आदीसह वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी खारघर खाडीत पाहावयास मिळत आहेत. खारघर शहरातील रहिवासीही पक्ष्यांना पाहावयास मोठी गर्दी करीत आहेत.
सुट्टीच्या दिवशी, मोठ्या संख्येने पक्षिप्रेमी या ठिकाणी डेरेदाखल येतात. उरण तसेच नवी मुंबईच्या खाडीत अशाप्रकारे विविध प्रजातीच्या पक्ष्यांना पाहावयास गर्दी केली जाते. त्याच धर्तीवर खारघरमध्येही दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन घडत आहे.खारघर खाडीचे संवर्धन करून या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक उभारण्याची मागणी स्थानिक नगरसेविका संजना कदम यांनी यापूर्वीच सिडको प्रशासनाकडे केली आहे. सिडकोने पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास हे ठिकाण नव्याने पर्यटनक्षेत्र म्हणून उदयास येईल. तसेच दुर्मीळ पक्ष्यांचीही रेलचेल वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खारघर खाडीत मोठ्या संख्येने देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी हजेरी लावत आहेत, यामुळे आम्हा पक्षिप्रेमींमध्ये आनंद आहे. या ठिकाणाचा पर्यटनक्षेत्र म्हणून विकास केल्यास त्याला पर्यटनप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल.- युवराज वर्कड, पक्षिप्रेमी, खारघर