मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी, मार्गावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 03:52 AM2018-08-26T03:52:49+5:302018-08-26T03:53:10+5:30
प्रवासी त्रस्त : जिते, गोविर्ला फाटा, आंबिली फाटा, हमरापूर, रामवाडी मार्गावर खड्डेच खड्डे
वडखळ : मुंबई-गोवा महामार्गावर सातत्याने वाहतूककोंडी होत आहे. खड्डेमय रस्ते, रुंदीकरणाच्या कामांमुळे प्रवासात विलंब होत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे. गेल्या वर्षभरात महामार्गाची पुरती वाट लागली असून, ठेकेदार बदलल्यापासून कामाचा दर्जा पूर्णपणे खालावला आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे.
विशेषत: जिते, गोविर्ला फाटा, आंबिवली फाटा, हमरापूर फाटा, इरवाडी, रामवाडी पूल, उंबर्डे फाटा ते वडखळपर्यंत खड्डेच खड्डे आहेत. सध्या खड्डे भरण्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी ऐकेरी वाहतूक सुरू आहे. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवून खड्डे भरले असले तरी पेव्हर ब्लॉक लेवलमध्ये नसल्याने तेथून प्रवास करतानाही प्रवाशांना त्रास
होतो. दुचाकीस्वारांना पेव्हर ब्लॉकवरून गाडी नेताना कसरत करावी लागते. महामार्गावर पेणजवळ भोगावती नदीवर नवीन पूल बांधण्यात आला आहे; परंतु या पुलाला वर्ष होत नाही तोच मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने कोंडी होत आहे. तरणखोप बायपास ते अंतोरा फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
खड्डे भरण्याच्या कामाचा वेग व कामाचा दर्जा पाहता हा रस्ता कधी सुस्थितीत येणार, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे तर भोगावती नदीवरील पुलावरही खड्डे पडले असून या पुलावरील खड्डे ‘जैसे थे’ आहेत. आता सणासुदीचे दिवस असल्याने महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे; परंतु भोगावती पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कायमच वाहतूककोंडी होत आहे. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यापूर्वी तरी महामार्गावरील खड्ड्यांचे हे विघ्न दूर होईल का? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.