दासगाव : गणेशोत्सवासाठी चाकरमानी लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत. चाकरमान्यांच्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी महामार्ग पोलीस वाहतूक शाखेने आपल्या हद्दीत असलेल्या पळस्पे ते सिंधुदुर्गपर्यंत ५५४ कर्मचारी तर ४० अधिकारी तैनात केले आहेत. हा बंदोबस्त काळ २२ आॅगस्टपासून संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी लावण्यात आला आहे.कोकणातील मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात या ठिकाणी कामानिमित्त गेलेले आहेत. गणेशोत्सवात कितीही मोठ्या अडचणी येवो मात्र मोठ्या संख्येने हे आपल्या गावी या सणासाठी हजर राहतात. चाकरमान्यांच्या प्रवासाला कोणताही अडथळा येवू नये यांना आपल्या गावी जाताना तसेच पुन्हा परतीच्या प्रवासाला त्रास होवू नये यासाठी मुंबईपासून तर कोकणाच्या तळापर्यंत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षी ठिककिठाणी मोठ्या संख्येने महामार्ग वाहतूक शाखा महामार्ग ठाणे यांच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात येतो. त्याप्रमाणे यंदाही तैनात करण्यात आलेला आहे.लाखो वाहने कोकणात येणारमुंबई तसेच अन्य राज्यातून चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. जवळचा मार्ग मुंबई - गोवा महामार्ग तर दुसरा पुणे मार्ग. मात्र या मार्गाने कोकणात जाण्यासाठी जास्त वेळ आणि अंतरही जास्त. त्यामुळे या सणासाठी जाणारी लाखो वाहने मुंबई-गोवा महामार्गानेच कोकणात दरवर्षी जातात.नवीन होणारे महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम, महामार्गाला पडलेले मोठमोठे खड्डे अशा परिस्थितीत निर्माण होणाºया अडथळ्याला दूर करण्यासाठी तसेच चाकरमान्यांच्या प्रवासात विघ्न येवू नये यासाठी यंदा देखील राष्टÑीय महामार्ग वाहतूक पोलीस शाखा ठाणे यांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा महामार्गावर तैनात केला आहे.मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते रत्नागिरी रासायनिक झोन असलेल्या औद्योगिक वसाहती आहेत, तर माणगाव ते पळस्पे दरम्यान स्टील औद्योगिक आहेत. कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल लागतो तर त्याच प्रमाणात कारखान्यातील तयार माल बाहेर पडतो. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये वाळू उत्खनन आहे. खनिज उत्खनन देखील मोठ्या प्रमाणात आहे. डंपर, आयवा मोठे ट्रक, मल्टी एक्सल गाड्यांमधूनही ही वाहतूक केली जाते. महामार्गावर इतर वेळी देखील या वजनदार गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. ही बाब लक्षात घेऊन प्रतिवर्षी गणेशोत्सव काळात या अवजड वाहनांची वाहतूक कायदेशीर बंद केली जाते. यंदाही मंगळवारपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे.संपूर्ण कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. गणेशोत्सव काही तासांवर येवून ठेपला आहे. उत्सव काळात आपल्या आराध्य दैवताची मनोभावे पूजा करण्यासाठी प्रत्येक जण घरी जाण्याच्या तयारीत असला तरी पोलीस कर्मचाºयांचा गणेशोत्सव महामार्गावर उभारण्यात आलेल्या छावण्यांमध्येच जाणार आहे. महामार्गावर ठिकठिकाणी कापडी तंबू उभारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी पोलीस कर्मचाºयांना २४ तास तैनात करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांचा गणपती उत्सव महामार्गावर वाहनांना वाट काढून देणे आणि कायदा सुव्यवस्था जपणे यामध्येच जाणार आहे.तत्काळ सेवामुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते कसाल या आठ महामार्ग वाहतूक पोलीस शाखा अंतर्गत येणाºया शासकीय रुग्णालयाच्या रुग्णवाहिका १०८ सेवा देणारी रुग्णवाहिका तसेच खासगी रुग्णवाहिका ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच क्रेन व ठिकठिकाणच्या वाहतूक शाखेच्या मोटारसायकल तसेच जीप या देखील तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत.मंगळवारपासून कोकणात सणानिमित्त जाणारी वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली आहे. यामुळे महामार्ग वाहतूक शाखा कार्यालय ठाणे यांनी मुंबई-गोवा महामार्गावर संपूर्ण कोकणाच्या तळापर्यंत जाणाºया चाकरमान्यांना कोणत्याही तºहेचा प्रवासात त्रास होवू नये, त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा याची पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे.२५ आॅगस्टच्या गणपतीनिमित्त चाकरमान्यांसाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून २१०० एसटी धावणार आहेत.मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे तसेच चौपदरीकरणाच्या कामानिमित्त होणारे अडथळे तसेच यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे पाहता संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग या लांब पल्ल्याच्या एसटीच्या ६०० ते ७०० गाड्या पुण्यामार्गे जाण्याची शक्यता आहेजवळपास १४०० एसटी महामंडळाच्या गाड्या याच मुंबई- गोवा महामार्गाने धावण्याची शक्यता आहे. कोकणात जाणारा चाकरमानी त्रास झाला तरी या मार्गालाच पसंती देतो.
गणेशोत्सवासाठी वाहतूक पोलीस सज्ज; पळस्पे ते सिंधुदुर्गपर्यंत ५५४ कर्मचारी तर ४० अधिकारी तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 3:27 AM