- वैभव गायकरपनवेल : व्हीआयपी ट्रीटमेंट मिळण्यासाठी वाहनावर लाल दिव्याचा वापर करून वाहतूक पोलिसांना धाक दाखविणाऱ्या एका वाहनधारकावर खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल मनोहर बामणे (२७) असे या वाहनधारकाचे नाव आहे. त्याला अटक करून नंतर जामिनावर सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.खारघर वाहतूक शाखेचे कर्मचारी मारु ती सानप व रवींद्र टकले हे शनिवारी हिरानंदानी उड्डाणपाखाली वाहतूक नियमन करीत असताना दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास एक इनोव्हा गाडी उड्डाणपुलाखाली थांबली. ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी या गाडीच्या चालकाची चौकशी करून लायसन्सची विचारणा केली. त्यानुसार चालकाने लायसन्स दाखविले. परंतु वाहनाच्या कागदपत्राची तपासणी करताना वाहतूक पोलिसांना गाडीच्या डॅशबोर्डवर नारंगी रंगाचा अंबर दिवा आढळून आला. यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी खारघर पोलिसांना याबाबत माहिती दिली. खारघर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असता लातूरच्या गायकवाड नामक खासदारांचे पत्र सोबत बाळगून हा वाहन चालक लाल दिवा मिरवत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी खारघर पोलिसांनी वाहन चालक स्वप्निल मनोहर बामणे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी दिली. संबंधित वाहन चालकाची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र लोकसेवक आमदार, खासदार, वरिष्ठ सरकारी अधिकाºयांच्या पदाचा वापर करीत वाहन चालक कशाप्रकारे बडेजाव मिरवत आहेत हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
वाहतूक पोलिसांना लाल दिव्याचा धाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:23 AM