महामार्गावर वाहतूक निर्बंध

By Admin | Published: August 28, 2016 04:07 AM2016-08-28T04:07:31+5:302016-08-28T04:07:31+5:30

गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यास युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. दरवर्षी लाखो गणेशभक्त कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग करतात. महाराष्ट्राचे आराध्य

Traffic restrictions on the highway | महामार्गावर वाहतूक निर्बंध

महामार्गावर वाहतूक निर्बंध

googlenewsNext

- जयंत धुळप, अलिबाग

गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यास युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. दरवर्षी लाखो गणेशभक्त कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग करतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायांच्या आगमनाकरिता कोकणात जाणाऱ्या सुमारे १० लाख चाकरमानी गणेशभक्तांच्या निर्विघ्न प्रवासाकरिता यंदाही गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परिवहन आयुक्तांच्या निर्णयानुसार अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. वाहतूक निर्बंध व अजवड वाहनांना बंदी असली, तरी दूध, पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल, आॅक्सिजन व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना बंदी लागू होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

१६ टनपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना बंदी
१ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ५ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेल्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. ६ ते १४ सप्टेंबर २०१६ या कालावधीत महामार्गावर सकाळी ८ ते रात्री ८ या काळात अवजड वाहने, ट्रेलर, ट्रकला बंदी राहील.

गणेश विसर्जनाकरीताही अवजड वाहतूक बंद
पाच दिवसांचे गणपती व गौरी विसर्जन व सात दिवसांचे गणपती विसर्जन या निमित्त ९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १२ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत रेतीचे ट्रक, ट्रेलर, तसेच अवजड वाहने ज्या वाहनांची वजन क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा वाहनांची पूर्णत: बंद राहील.

अनंत चतुर्दशीलाही वाहतूक बंद
अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनानिमित्त १५ सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते १६ सप्टेंबर रात्री आठ वाजेपर्यंतच्या कालावधीत वाळू व रेतीच्या वाहतुकीस व अवजड वाहने ज्या वाहनांची वजन क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.

वाळू व रेती वाहू वाहनांना बंदी
१ सप्टेंबर २०१६ मध्यरात्री १२ वाजल्यापासून १६ सप्टेंबर २०१६ रात्री १२ वाजेपर्यंत वाळू व रेतीच्या वाहतुकीस पूर्णत: बंदी करण्यात आली आहे.

मालास विलंब, परिणामी औद्योगिक क्षेत्राचे नुकसान
अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम, तर रायगड जिल्ह्यातील महाड, रोहा, रसायनी, पनवेल आणि विळेभागाड औद्योगिक वसाहतींमध्ये कच्चामाल पोहोचण्यास व तयार माल बाजारपेठेत पोहोचण्यास विलंब होऊन कारखानदारांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात नाराजीचा सूर आहे. रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रे, तसेच आरसीएफ, जेएसडब्ल्यू, रिलायन्स, उत्तम आदी उद्योगांच्या निमित्ताने दररोज सुमारे २० हजार वाहनांची वर्दळ बंद राहील.

सुमारे ५० हजार वाहने कोकणात जाणार
५ सप्टेंबर रोजी गणेश आगमन होणार असून, गेल्या पाच वर्षींच्या परिवहन विभागाच्या नोंदीनुसार गणेश आमगमनाच्या आधीच्या पाच दिवसांत सुमारे दोन हजार एसटी बसेस, दोन हजार खासगी बसेस, तर अन्य सुमारे ४० हजार खासगी वाहने अशा एकूण सुमारे ५० हजार वाहने कोकणात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना बंदी करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे गणेशभक्तांनी स्वागत केले आहे.

Web Title: Traffic restrictions on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.