ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरील जलवाहतूक पुन्हा झाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:39 PM2019-08-29T23:39:37+5:302019-08-29T23:40:40+5:30
पर्यटकांची गर्दी : आगरदांडा व खोरा बंदरातून १ सप्टेंबरपासून यांत्रिकी बोटी सुरू होणार; मेरीटाइम बोर्डाने दिली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील राजपुरी बंदरात असणाऱ्या ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी असणाºया शिडांच्या बोटीची वाहतूक गुरुवारपासून सुरू झाली आहे. वर्षाला पाच लाख पर्यटक या किल्ल्यास भेट देत असतात. पावसाळी हंगामात या किल्ल्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पावसाचा जोर कमी होताच किल्ल्याची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
गणेशोत्सवात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने उत्सवाचे काही दिवस सोडले तर उर्वरित दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. राजापुरी जेटीवरून १३ शिडांच्या बोटींतून प्रवाशांची वाहतूक केली जाते. पाऊस कमी झाला असून वाºयाचा वेगही कमी झाल्याने प्रशासनाने जंजिरा किल्ल्यावरील जलवाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा २२ एकर परिसरात व्याप्त असून, किल्ल्यावर २२ बुरुज आहेत. समुद्राच्या चहूबाजूने खारे पाणी असतानासुद्धा किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत. कलाल बागडीसारखी महाकाय तोफ आहे. समुद्राच्या मध्यभागी हा किल्ला असल्याने सर्व पर्यटकांना याचे आकर्षण असून, दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक या ठिकाणी भेट देतात.
गेल्या काही वर्षांत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शिडांच्या बोटींची परवानगी रद्द करण्यात आली होती; परंतु त्यांनी वचनपत्र व पुन्हा कधीही नियमांचे उलंघन होणार नाही, असे लिहून दिल्यामुळे १३ शिडांच्या बोटींना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आल्याचे महाराष्टÑ मेरीटाइम बोर्डाचे राजपुरी बंदराचे सहायक बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांनी सांगितले. एका शिडाच्या बोटीमध्ये २२ व्यक्तींनाच प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे लाइफ जाकीटही घालणे क्रमप्राप्त असणार आहे. बोर्डातील प्रत्येक कर्मचारी जलवाहतुकीवर लक्ष ठेवणार असून पर्यटकांच्या सुरक्षिततेवर अधिक लक्ष देणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना ने-आण करण्यासाठी जंजिरा पर्यटक जलवाहतूक सोसायटीस परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वेलकम सोसायटीलाही परवानगी देण्यात आली आहे. जंजिरा किल्ल्यावर आगरदांडा व खोरा बंदरातून यांत्रिकी बोटीसुद्धा असून, त्या १ सप्टेंबरपासून सुरुवात करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- यशोधन कुलकर्णी,
सहायक बंदर निरीक्षक,
राजापुरी बंदर