- सिकंदर अनवारे दासगाव : यंदाच्या पावसाळ्यात महाड तालुक्यातील केंबुर्ली गाव हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्यानंतर मातीचा ढिगारा साफ करताना सावित्री नदीलगतचा कठडा तोडण्यात आला. मात्र अद्याप त्याची दुरुस्ती किंवा त्याठिकाणी दुसरा कठडा न बांधल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणात महाड तालुक्यातील केंबुर्ली गाव हद्दीत वळणावरील फोडण्यात आलेला डोंगर राष्टÑीय महामार्गाच्या वाहतुकीस सध्या डोकेदुखी ठरत आहे.एका बाजूने सावित्री नदी दुसऱ्या बाजूने डोंगरातून महामार्गावरील वाहतूक सुरू आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे चौपदरीकरणाचे काम अपूर्णच राहिले आहे. पावसाच्या सुरुवातीलाच तीन वेळा मातीचा ढिगारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.५ जुलै रोजी सकाळी मातीचा ढिगारा येऊन महामार्गावर कोसळला. हा मातीचा ढिगारा उपसण्यासाठी तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी जवळपास ५ तास लागले.चौपदरीकरणाच्या ठेकेदार कंपनीने जेसीबी आणि इतर माती उपसण्याच्या यंत्रणेद्वारे कोसळलेला मातीचा ढिगारा शेजारी असलेल्या सावित्री नदीत लोटला. यावेळी महामार्गावरील सावित्री नदीला लागून असलेला संरक्षण कठडा तोडण्यात आला. मात्र नंतर या ठिकाणी दक्षता म्हणून किंवा सुरक्षा म्हणून कोणतीच खबरदारी घेण्यात आलेली नाही. दुसºया टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून संपूर्ण महामार्ग त्यांच्या ताब्यात देण्यात आला असल्याने या ठिकाणी तोडण्यात आलेल्या कठड्याकडे महामार्ग विभागाने दुर्लक्ष केले आहे.सध्या ठेकेदार कंपनी देखील लक्ष देत नाही आणि महामार्ग विभाग देखील लक्ष देत नाही. त्यामुळे याठिकाणाच्या महामार्गावरील वाहतूक धोक्यात आली असून अपघाताला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. यामुळे सध्या प्रवासी वर्गामध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.दरड कोसळल्यानंतर याठिकाणची पाहणी महामार्ग वाहतूक शाखा पोलिसांकडून करण्यात आली होती व धोकादायक स्थिती असल्याचे पत्र देखील ठेकेदार कंपनीला यांचेकडून देण्यात आले होते, मात्र अद्याप त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.>अरुंद रस्त्यामुळे बसणार फटकाचौपदरीकरणाच्या खोदकामानंतर पावसामध्ये तीन वेळा या ठिकाणी मातीचा ढिगारा महामार्गावर येऊन कोसळला. मातीच्या ढिगाºयामुळे काही माती आजही रस्त्याच्याकडेला आहे. त्यामुळे साइडपट्टी कमकुवत झाली आहे. ठेकेदाराकडून रस्त्यावरच गार्ड लावण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीसाठी महामार्ग अरुंद झाला असून मोठ्या प्रमाणात वळणाचा भाग आहे. समोरुन येणारे वाहन एकामेकाला लगेच दिसत नाही. व पुन्हा सावित्री नदीला लागून असलेला तुटलेला कठडा (संरक्षण भिंत) दोन्ही बाजूने मोठी वाहन याठिकाणी आली तर धोकादायक स्थिती निर्माण होते. त्यामुळे सुरक्षा म्हणून कठडा असणे महत्त्वाचे आणि गरजेचे आहे, अन्यथा सावित्री नदीमध्ये एक वाहन कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.>महामार्गावरील मातीचा ढिगारा उपसण्यात आला त्यावेळी मातीखाली टाकण्यासाठी नदीला लागून असलेला संरक्षण कठडा हा तोडण्यात आला. संबंधित ठेकेदार कंपनीला कठडा बांधण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.- सचिन गवळी, पोलीस उप. निरीक्षक, महामार्ग वाहतूक शाखा पोलीस
सावित्री नदीवरील तुटलेल्या कठड्यामुळे वाहतुकीस धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 3:01 AM