- मधुकर ठाकूर उरण - प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत चालणाऱ्या युथ नेट प्रोग्रॅममध्ये कौशल्य कल्पकता कार्यक्रमांतर्गत देशातील विविध जिल्ह्यातील दहा ते अठरा वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यात चांद्रयान-३ साठी रायगड जिल्ह्यातून मेसेज टू मूनसाठी १४३ विद्यार्थ्यांचे कल्पक संदेश आणि फोटो पाठविण्यात आले होते. त्यापैकी उरण व पनवेल तालुक्यातील ३६ विद्यार्थ्यांची या प्रोजेक्टसाठी निवड झाली होती. या विद्यार्थ्यांसाठी पुढील मार्गदर्शनासाठी नेहरू सायन्स सेंटर मुंबई येथे कॅम्पमधून खगोलशास्त्र तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले.
या उपक्रमांतर्गत मेसेज टू मून हा उपक्रम घेण्यात आला होता. यामध्ये उरण तालुक्यातील राजिप शाळा मोठीजुई, राजिप शाळा आवरे तर पनवेल तालुक्यातील सुएसो माध्यमिक विद्यालय चिंध्रण, राजिप शाळा सुकापुर, श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय वावंजे आदी शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने नेहरू सायन्स सेंटर मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. त्यांना खगोलशास्त्राबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून काही मॉडेल्स बनवून घेण्यात आल्या. त्यामध्ये तारामंडळ, सूर्यमाला, सन इज वन, कंपासच्या साह्याने दिशा कशा शोधल्या जातात. त्याचबरोबर ग्रहाबद्दल माहिती देण्यात आली.
त्यानंतर कॅम्प पूर्ण केलेल्या सहभागी सर्व विद्यार्थ्यांना नेहरू सायन्स सेंटर मुंबई द्वारा प्रशस्तीपत्र देण्यात आले.या सर्व विद्यार्थ्यांना कौशल्य कॅम्पमध्ये खूप काही शिकायला मिळाले. मुलांमध्ये जे सुप्त गुण दडलेले असतात, त्यांना वाव मिळावा याकरीता अशा प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा साजेसा प्रयत्न करत असते. अशी माहिती प्रथम एज्युकेशनच्या जयवंती गोंधळी यांनी दिली.