महाड, पोलादपूर तालुक्यातील व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:53 PM2019-08-28T23:53:39+5:302019-08-28T23:53:47+5:30
बँका, शासकीय कार्यालयातील कामे रखडली : बिल थकवल्याने बीएसएनएलचा वीजपुरवठा तोडला
सिकंदर अनवारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : गेले सहा महिने बीएसएनएल कंपनीने महावितरणचे वीज बिल थकवल्याने ठोस भूमिका घेत महावितरणने बीएसएनएलचे महाड, एमआयडीसी आणि पोलादपूर या तीन ठिकाणचे मुख्य कंट्रोलचे वीज कनेक्शन तोडल्याने दोन्ही तालुक्यांतील बीएसएनएलची सर्व सुविधा ठप्प झाली आहे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम झाला आहे.
बीएसएनएल कंपनीने गेले सहा महिने वीज वितरणाचे लाखो रुपये वीज बिल थकवले आहे, त्यामुळे अचानक मंगळवारी महावितरणने बीएसएनएल कंपनीचा महाड, एमआयडीसी आणि पोलादपूर या तीन ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांत भारत संचार निगमच्या सेवेवर अवलंबून असलेल्या सर्वच सेवांचा कारभार कोलमडला आहे. शासकीय कार्यालये, एटीएम, खासगी कार्यालये, दुकानदार, व्यापाऱ्यांचे यामुळे नुकसान झाले आहे. महाड शहरासह संपूर्ण तालुक्यातील सेवेचा यामुळे बोजवारा उडाला आहे.
ऐन पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीत महावितरण कार्यालयाने ही कारवाई केल्याने ग्राहक आणि नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. महाडमधील सर्व शासकीय बँका, खासगी बँका, पतसंस्था, शासकीय कार्यालयातील दूरध्वनी बंद आहेत. यामुळे शहरातील एटीएममधून पैसे काढणे आणि बँकातून पैसे काढणे आणि भरणा करणे, असे व्यवहार न झाल्याने ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांना परत जावे लागले आहे.
महाड महावितरणच्या माहितीनुसार किमान १४ लाख रुपयांचे वीज बिल गेल्या सहा महिन्यांपासून थकीत आहे. मात्र, महावितरण विभागाने तालुक्यातील बीएसएनएलच्या सेवेचा विचार न करता केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त होत आहे. ज्या महावितरण विभागाने वीज तोडण्याची कारवाई केली, त्या महावितरण विभागालाही याचा फटका बसला आहे. महावितरणची वीज बिलेही यामुळे भरली गेली नाहीत, तर महावितरण विभागाचे दूरध्वनीही बंद पडले होते.
महाडमध्ये २५ मोबाइल टॉवर
भारत संचार निगमचे महाड तालुक्यात जवळपास २५ मोबाइल टॉवर आहेत. मोबाइलचे किमान २० हजार ग्राहक आहेत, तर लॅण्डलाइनचे जवळपास २००० ग्राहक आहेत, तर इंटरनेटचेही ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत. महाड तालुक्यात तुडील, चिंभावे, नागाव, विन्हेरे, फौजी आंबवडे, बिरवाडी, वरंध, निगडे, वाळण, वाकी, नाते, पाचाड, मांडले, वहूर या ठिकाणी दूरध्वनी केंद्र आहेत. महाड शहर, औद्योगिक क्षेत्र, पोलादपूर आणि आंबेत या ठिकाणी वीजपुरवठा तोडल्याने संपूर्ण तालुक्यातील सेवा ठप्प झाली आहे.
भारत संचार निगम लिमिटेडने महावितरणची वीज बिल थकबाकी केल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे.
- चंद्रकांत केंद्रे,
उपअभियंता,
महावितरण, महाड
बीएसएनएलकडून वीज बिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून हालचाली सुरू असून, येत्या दोन दिवसांत सर्व व्यवस्था पूर्वपदावर येईल.
- सी. एन. सोनार,
विभागीय अभियंता, बीएसएनएल, महाड