मकर संक्रांत म्हणजे संक्रमण... मानवी जीवनात अनेक संक्रमणावस्था येत असतात. अनेक संकटांचा सामना करून सामान्य माणूस जीवन कंठत असतो. तसे प्रत्येकाचेच आयुष्य हे विविध संक्रमणांनी भरलेले असते...पण सार्वजनिक आयुष्याचा विचार करता सगळ्या क्षेत्रांनाही संक्रमणावस्थेचा सामना करावाच लागतो. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले आणि मुंबईकरांशी निगडित असलेल्या अनेक विषयांतील तज्ज्ञांशी संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ‘टीम लोकमत’ने संवाद साधला... समाजजीवन व्यापणारी विविध क्षेत्रे कोणकोणत्या संक्रमणावस्थेतून जात आहेत... त्याचा आम्ही घेतलेला हा धांडोळा... सध्या जनहिताचे अनेक प्रश्न न्यायालयाच्या आदेशामुळे व निकालांमुळे मार्गी लागत चालले आहेत़ परिणामी समाजाच्या अपेक्षा न्यायालयाकडून वाढल्या आहेत़ कारण सर्व स्तरावर निराशा होत असल्याने न्यायदानाकडे सर्वांचे लक्ष लागणे स्वाभाविकच आहे़ अशात न्यायालयाने अनेक जनहिताचे निर्णय दिले आहेत़ लोकांच्या समस्यांना आवाज दिला़ न्यायालयाने अनेक मुद्दे स्वत:हून सुओमोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतले़ त्यामुळे समाजही न्यायालयाकडे त्याच अपेक्षेने बघत आहे़ - अभिनंदन वग्यानी, मुख्य सरकारी वकील
तणावपूर्ण जीवनशैलीमुळे नवीन आजार आले. या उपचारांसाठी नवीन टेक्नोलॉजी आणि औषधे आली. यातील औषधांमुळे शस्त्रक्रियेशिवाय आजार बरे होऊ लागले. वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे आयुर्मान वाढलेले आहे. टेक्नोलॉजीमुळे इन्व्हेस्टिगेशनचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी कमी इन्व्हेस्टिगेशन करूनही औषधे दिली जात होती. पण, आता रुग्ण सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जातो. यामुळे खर्च वाढलेला आहे. रुग्णांमध्ये जागरूकता वाढलेली आहे. ही तशी चांगली बाब आहे, पण यामुळे अधिक पैसेदेखील खर्च होत आहेत. -डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, सायन रुग्णालय
सध्याच्या युगात सीसीटीव्ही, मोबाइल ट्रॅकिंग किंवा मोबाइल कॉल रेकॉर्ड, फॉरेन्सिक सायन्सच्या मदतीने पोलीस गुन्ह्यांची उकल चटकन करू शकतात. हे तंत्रज्ञान पोलिसांनी अवगत करायला हवे. कारण गुन्ह्यांची पद्धत जशी बदलते आहे तसे गुन्हेगारही हुशार होत चालले आहेत. - वाय.पी. सिंग, माजी आयपीएस अधिकारी