कशेडी घाटात वाहतूक सुरळीत
By Admin | Published: November 16, 2015 02:19 AM2015-11-16T02:19:53+5:302015-11-16T02:19:53+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी सकाळी एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाला होता
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी सकाळी एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाला होता. यामुळे टँकर कलंडल्याने वायुगळती होत होती. ही वायुगळती चोवीस तासानंतर थांबविण्यात यश आले आहे.
अपघातानंतर शनिवारी महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी तुळशी खिंड, विन्हेरे महाड, राजेवाडी, काटेतळी, नागाव अशी पर्यायी मार्गाने वळविली होती. पोलिसांना खेड लोटे येथून औद्योगिक वसाहतीतील विनीती आॅरगॅनिक कंपनीतील वायुरोधक पथकास पाचारण करून काही अंशी वायुगळती थांबविण्यात यश मिळवले. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी उरण येथील भारत गॅस कंपनीच्या वायुरोधक पथकास पाचारण केले. हे पथक रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने अथक परिश्रमानंतर वायुगळती थांबविण्यात यश मिळवले.
या वायुरोधक पथकामध्ये भारत गॅस कंपनीचे आॅपरेशन सेक्शन अधिकारी आनंद राऊत, असिस्टंट अधिकारी मनोज पाटील, कृष्णा कडू, दयाराम पाटील, अमोल कांबळे, जॉन राजे अशा सहा जणांचा समावेश होता. अपघातग्रस्त टँकरमधील द्रवरूप वायू रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्टिंग करण्यात या पथकाला यश आल्याने मोठी दुर्घटना टळली असून महामार्ग पोलीस व खेड पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
तब्बल २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले असून रविवारी सकाळी १० वाजता कशेडी घाटातील महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आल्याचे महामार्ग कशेडी टॅपचे एएसआय माने यांनी
सांगितले.
कशेडी घाटात अनेक वेळा लहान-मोठे अपघात होतात. यामुळे येथे वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. (वार्ताहर)