आंदोलनामुळे वाहतूककोंडी; नेरळ-माथेरान वाहतूक दोन तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:47 AM2018-12-09T00:47:40+5:302018-12-09T00:47:55+5:30
तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांनी शनिवारी नेरळ येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे कर्जत-कल्याण आणि नेरळ-माथेरान रस्त्यावरील वाहतूक दोन तास खंडित झाली होती.
कर्जत : तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांनी शनिवारी नेरळ येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे कर्जत-कल्याण आणि नेरळ-माथेरान रस्त्यावरील वाहतूक दोन तास खंडित झाली होती. मात्र, आंदोलनामुळे कर्जत-नेरळ-डोणे या कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या कामाला सुरु वात करण्यात आली.
तालुक्यातील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी एका हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यातील पहिले रास्ता रोको आंदोलन शनिवारी नेरळ येथील हुतात्मा चौकात झाले. नेरळ-माथेरान टॅक्सी संघटना, नेरळ रेल्वे प्रवासी संघटना, नेरळ व्यापारी फेडरेशन, नेरळ ज्येष्ठ नागरिक संघ, नेरळ संघर्ष समिती, उत्तर भारतीय व्यापारी संघ, नेरळ परिसर वारकरी संप्रदाय याशिवाय नेरळमधील रिक्षा संघटना यात जय हनुमान, जय भवानी, जय मल्हार, दामत स्टँड, साई एकविरा, ओंकार मिनीडोअर, हुतात्मा कोतवाल, जय मल्हार, जय अंबे या रिक्षा संघटना तसेच टेम्पो संघटना यांचा सहभाग होता.
कर्जत तालुक्यात काम करणारे राष्ट्रीय मानवाधिकार, राजे प्रतिष्ठान, पोलीस मित्र संघटना, कर्जत तालुका आदिवासी संघटना, शिव सहकार सेना, कर्जत बार असोसिएशन, कर्जत मेडिकल स्टोअर असोसिएशन, कर्जत खादी ग्रामोद्योग संघ, नाभिक संघटना, कोतवालवाडी ट्रस्ट, माथाडी कामगार संघटना, अखिल आदिवासी संघ, सकल मराठा क्रांती संघ या संघटना यांचा सक्रि य सहभाग होता. तर अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांसह चालक, माथेरानला येणारे पर्यटक त्रस्त होते. आंदोलनानंतर रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.
जवळपास ५०० नागरिकांचा सहभाग
कर्जत तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संजय भालेराव, सुधाकर राठोड आणि सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने दिलेले निवेदन स्वीकारले.
जवळपास ५०० हून अधिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. रास्ता रोको आंदोलन झाल्यामुळे कर्जत भागाकडे पंचवटी येथे वाहतूक खोळंबून राहिली होती तर कल्याणकडे दामतपर्यंत नेरळ गावातील सर रस्ते आणि माथेरानकडे नांगरखिंडपर्यंत वाहतूक खोळंबून राहिली होती.
कर्जत तालुक्यात सर्वाधिक खड्डे असलेल्या कर्जत-नेरळ-डोणे या कल्याण राज्यमार्ग रस्त्याचे काम आंदोलनानंतर सुरू करण्यात आले. रस्त्याचे ठेकेदार पी. पी. खारपाटील यांची वाहने या रस्त्यावर डांबर घेऊन दुरुस्तीच्या कामाला लागली आहेत.
रिक्षा, टॅक्सी संघटनांचा सहभाग
सकाळी ९.१५ वाजता सुरू झालेल्या आंदोलनामुळे कर्जत-कल्याण, नेरळ-माथेरान या रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली. आंदोलनात नेरळमधील सर्व रिक्षा संघटना आणि टॅक्सी संघटना यांनी पाठिंबा देऊन सहभाग घेतल्याने स्थानिक वाहनांमुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी अनुभवास मिळाली.