दासगावच्या शेतकऱ्यांचा शेतावरचा प्रवास होडीतून, भातलावणीसाठी लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 02:32 AM2018-07-05T02:32:29+5:302018-07-05T02:32:45+5:30
ऐन पावसाळ्यात भातलावणीसाठी खांद्यावर नांगर, डोक्यावर भाताच्या रोपांचे भारे, हातात बैलांची जोडी, महिलांच्या डोक्यावर न्याहारीची टोपली असे चित्र सर्वत्र दिसून येते.
- सिकंदर अनवारे
दासगाव : ऐन पावसाळ्यात भातलावणीसाठी खांद्यावर नांगर, डोक्यावर भाताच्या रोपांचे भारे, हातात बैलांची जोडी, महिलांच्या डोक्यावर न्याहारीची टोपली असे चित्र सर्वत्र दिसून येते. मात्र, महाडमधील दासगावमधील भोई वाड्यातील शेतक-यांना त्यांच्या शेतावर जायचे असेल तर होडीतून प्रवास करत जावे लागते. गावापासून असलेल्या एका बेटावर असलेल्या जमिनीवर शेकडो एकर भात शेती आहे. याठिकाणी जाण्यासाठी सावित्रीचे पात्र ओलांडून जावे लागते.
सध्या भातलावणीला सर्वत्र जोर असून जिकडे तिकडे भात शेतात लावणी करणारे शेतकरी, नांगर धरलेले शेतकरी दिसून येत आहेत. डोक्यावर भाताची रोपे घेवून शेतात काम करणारे शेतकरी सर्वत्र दिसत असले तरी तालुक्यातील दासगावमध्ये मात्र लावणीकरिता होडीतून प्रवास करणारे शेतकरी दिसून येतात. दासगाव हे पूर्वीचे बंदर असलेले गाव. सावित्री नदीच्या काठावर हे गाव असले तरी हा संपूर्ण परिसर खाडीपट्टा म्हणूनच ओळखला जातो. खाडीचे खारे पाणी या भागात शिरल्याने अनेक ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी जमिनीची झीज होवून या भागात बेट तयार झाले आहेत. दासगावमधील बाग नावाने एक बेट असून या बेटावर दासगावमधील भोईआळीतील शेतकºयांच्या जमिनी आहेत. जवळपास २० हून अधिक शेतकºयांच्या जमिनी याठिकाणी आहेत. ऐन पावसाळ्यात मात्र या शेतकºयांना आपल्या शेतावर जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो. पाण्याचा प्रवाह असला तरी या होडीतूनच जीवघेणा प्रवास गेली अनेक पिढ्या सुरू आहे. बाग नावाचे हे बेट शिवकाळाआधीपासून अस्तित्वात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. याठिकाणी शिवकाळातील देखील वस्ती असावी असा निष्कर्ष येथे असलेल्या जुन्या विहिरी आणि दगडी वस्तूंवरून दिसून येत आहे.
दासगावमधील भोईवाडीतील शेतकरी प्रतिदिन शेतावर भातलावणीसाठी लागणारे सामान, नांगर, दोºया, न्याहारी हे सर्व डोक्यावरून नव्हे तर सावित्रीच्या खळखळणाºया पाण्याच्या प्रवाहातून होडीतून प्रवास करत शेतावर जावे लागत आहे. येथील शेतकºयांनी शेतावर जाण्यासाठी छोट्या होड्या घेतल्या आहेत. या बेटावर शेकडो एकर भात जमीन असून भात पिकाबरोबरच उन्हाळ्यात विविध कडधान्ये घेतली जातात. या बेटाच्या चहुबाजूंनी सावित्री खाडीचे पाणी असल्याने पूर्वी कडधान्य मोठ्या प्रमाणावर येत असत. मात्र, महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक पाण्याने जेव्हापासून खाडीचे पात्र बाधित झाले होते तेव्हापासून कडधान्याचे हे प्रमाण कमी झाले आहे. सध्या सुरू असलेल्या भात लावणीसाठी देखील तेथील विहिरीच्या पाण्याचा वापर केला जात आहे.
येथील जमीन ही सखल असल्याने पाणी साचून राहत नाही. यामुळे जेव्हा पाऊस सुरू होतो त्या पावसाच्या पाण्यातच नांगरणी करून चिखल केला जात आहे.
बेटावर असलेल्या घाणेकरीन मातेच्या आशीर्वादाने आजतागायत आम्हाला या बेटावर येताना कोणतीच अडचण आलेली नसल्याचे येथील ग्रामस्थ कृष्णा पडवळ यांनी सांगितले. या बेटावर घाणेकरीन मातेचे स्थान आहे. एका भल्या मोठ्या वृक्षाखाली हे स्थान असून शेतकºयांची अपार श्रद्धा आहे. प्रतिवर्षी या बेटावर येणारे शेतकरी देवीकडे होडीतून सुखरूप प्रवास आणि चांगली शेती याकरिता मनोभावे साकडे घालतात. देवीच्या या स्थानावर नमस्कार करूनच शेतकरी मग पुढे आपल्या शेतात कामाला लागतात.
शिवकालीन विहिरीचा पाण्याकरिता वापर
शिवकालीन बांधणीच्या येथे दोन विहिरी आहेत. दासगावमध्ये दौलतगड असल्याने याठिकाणी शिवकालीन वस्ती असल्यानेच या विहिरी बांधल्या गेल्या असाव्यात. एक विहीर ही गोलाकार तर दुसरी विहीर देखील गोलाकार असून विहिरीत जाण्यासाठी भुयारीमार्ग आणि पायºया बांधल्या गेल्या आहेत. उन्हाळ्यात याठिकाणी शेतकरी कडधान्य काढतात. चहुबाजूने पाणी असले तरी खाडीच्या पाण्याचा वापर अधिक होत नसल्याने या विहिरीच्या गोड्या पाण्याचा वापरच केला जातो. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी हेच विहिरीतील पाणी वापरले जाते.
चहुबाजूच्या पाण्याने जमिनीची होते धूप
या बेटाच्या चहुबाजूला सावित्रीचे खाडीपात्र आहे. पावसाळ्यात येथील पाण्याला वेग असतो. प्रतिवर्षी आदळणाºया लाटांनी जमिनीच्या कडेची धूप होत आहे. जमिनीच्या कडेला असलेली माती दिवसेंदिवस ढासळू लागली आहे. यामुळे या शेतकºयांच्या जमिनीच्या शेजारी संरक्षण भिंत असणे गरजेचे आहे. ज्यामुळे मातीची धूप कमी होवून शेतजमीन शाबूत राहील.
आम्ही गेली अनेक पिढ्या होडीनेच आमच्या शेतात भातलावणीसाठी जात असतो. हे बेट कधी झाले हे आमच्या मागील पिढीला देखील ज्ञात नाही. मात्र, जोराच्या पावसात आम्हाला शेतावर जाणे धोकादायक वाटते. कधी कधी पाण्याचा प्रवाह अधिक असला तर याठिकाणी जाणे शक्य होत नाही.
- विनोद पडवळ, शेतकरी
आमच्या गावातील भोईवाडीतील शेतकरी बेटावर शेती करण्यासाठी होडीतून जातात. या बेटावर शेकडो एकर जमीन असून याठिकाणी जाण्याकरिता पुलाची व्यवस्था झाल्यास विविध प्रकारची शेती करता येणे शक्य आहे. शिवाय या बेटाचा विकास होऊन शेतकºयांना देखील फायदा होणार आहे
- दिलीप उकीर्डे, सरपंच दासगाव