घाटमार्गातील प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:31 PM2019-08-30T23:31:29+5:302019-08-30T23:32:05+5:30

प्रवाशांमध्ये संताप : एसटीच्या शिवशाही बंद; महाडमधून पुण्याची वाट बिकट

Travel on the ghat road is dangerous | घाटमार्गातील प्रवास खडतर

घाटमार्गातील प्रवास खडतर

Next

संदीप जाधव।
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : महाड-भोर तसेच माणगाव-ताम्हिणी घाटमार्गाच्या दुरवस्थेमुळे महाडसह दक्षिण रायगडवासीयांना पुण्याची वाट अत्यंत बिकट झाली आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणाºया गैरसोईमुळे मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.


पुण्याला जाण्यासाठी दक्षिण रायगडवासीयांना भोर आणि ताम्हिणी हे दोन घाटमार्ग असले तरी गेल्या दोन वर्षांपासून या दोन्ही मार्गांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे मार्गांचा प्रवास अत्यंत खडतर बनला आहे. ताम्हिणी मार्गाचे नूतनीकरण गेल्या वर्षापासून अत्यंत मंदगतीने सुरू असल्याने या मार्गाने प्रवास हा कंटाळवाणा वाटत आहे. तर महाड- भोर मार्गाचे देखील रुंदीकरण सुरू असल्याने जागोजागी रस्ता खणून ठेवला आहे. यामुळे महाड-भोर-पुणे प्रवासाला पाच तासांहून अधिक काळ लागत आहे.


नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटमार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून दोन ठिकाणी घाट खचल्यामुळे पंधरा दिवसापासून हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूकदेखील पूर्णपणे बंद आहे. याला पर्याय म्हणून अनेक वाहने महाबळेश्वर मार्गाने पुण्याकडे ये-जा करीत आहेत.
मात्र या मार्गाने महाडकरांना पुण्याचे अंतर लांब पडत असून इंधनाचा खर्च वाढत आहे. या दोन्ही मार्गांची तातडीने दुरुस्ती शक्य नसून दोन्ही मार्गांच्या दुरुस्तीसाठी किमान चार-पाच महिने लागणार असल्याचे बोलले जात आहे.


महाड-पोलादपूरमधील असंख्य नागरिकांचा पुण्याशी निकटचा संबंध असून दक्षिण रायगडमधील हजारो विद्यार्थ्यांचा शिक्षणानिमित्त पुण्यात रहिवास आहे. तसेच महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यात कच्च्या मालाची आवक याच मार्गाने होत असते. पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला, व अन्नधान्याची आवकदेखील याच मार्गे दक्षिण रायगडमध्ये होत असते.
दक्षिण रायगडचे पुण्याशी असलेले सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यापारी संबंध लक्षात घेऊन लवकरात लवकर या मार्गाचे काम युद्धपातळीवरून पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र याबाबत राजकीय, आणि शासकीय मानसिकताच नसल्याने पुण्यासाठी दोन्ही मार्गांचा प्रवास मात्र अत्यंत खडतर आणि बिकट राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 

महाड आगारातून एसटीच्या सर्व गाड्या माणगाव ताम्हिणी मार्गाने सोडण्यात येत आहेत. मात्र महाड आगारातून शिवशाही बस रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत.
- शिवाजी जाधव, आगार व्यवस्थापक, महाड

Web Title: Travel on the ghat road is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.