रायगडावर पर्यटकाचा मृत्यू

By admin | Published: October 27, 2015 12:29 AM2015-10-27T00:29:44+5:302015-10-27T00:29:44+5:30

रायगड किल्ल्याच्या दर्शनासाठी पुण्याहून आलेल्या एका पर्यटकाच्या डोक्यावर दगड पडून त्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली.

Traveler's death at Raigad | रायगडावर पर्यटकाचा मृत्यू

रायगडावर पर्यटकाचा मृत्यू

Next

महाड : रायगड किल्ल्याच्या दर्शनासाठी पुण्याहून आलेल्या एका पर्यटकाच्या डोक्यावर दगड पडून त्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. पर्यटकाच्या या मृत्यूमुळे रायगड किल्ल्याच्या डागडुजीचा आणि देखभाल व दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांबाबत या गडाचा ताबा असलेल्या केंद्रीय पुरातत्त्व विभागाला कुठलेही सोयरसूतक नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
लक्ष्मण उबे (४८, रा. कोथरुड, पुणे) असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या पर्यटकाचे नाव असून, ते आपल्या आठ मित्रांसह पुण्याहून रविवारी रायगड पाहण्यासाठी आलेले होते. गड पाहून झाल्यावर संध्याकाळी ते चित्रदरवाजाच्या दिशेने खाली उतरत असताना बाजूच्या कड्यावरील एक सुटलेला दगड त्यांच्या डोक्यावर आदळला व ते त्याच ठिकाणी कोसळले. त्यांच्यासमवेत असलेल्या मित्रांनी त्यांना उचलून पायथ्याशी पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले, मात्र त्यापूर्वीच उबे यांचे निधन झाले होते.
गेल्या वर्षी कोसळलेल्या पायऱ्यांवरून घसरून दोघा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतरही कठडे व पायऱ्यांचे दगड कोसळून अनेक पर्यटक विशेषत: सहलीला आलेले विद्यार्थीही गंभीर जखमी झाल्याच्या असंख्य घटना वारंवार घडत असतात. मात्र गडाच्या जीर्ण झालेल्या पायऱ्यांच्या दुरुस्ती व देखभालीकडे पुरातत्त्व विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
महादरवाजा ते चित्रदरवाजापर्यंतच्या पायऱ्यांच्या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या मार्गाच्या लगत असलेले क ठडेदेखील ठिकठिकाणी तुटलेले आहेत. तर बाजूच्या कठड्यावरून दरडी तसेच मोठमोठे दगड येण्याच्याही घटना वारंवार घडतात. मात्र याबाबत पुरातत्त्व विभागाकडून उपाययोजना केली जात नाही. कड्यावरून खाली पथमार्गावर कोसळणाऱ्या दरडी व दगडांपासून संरक्षण मिळण्यासाठी कड्यावर जाळ्या बसवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.
येत्या डिसेंबर महिन्यात राज्य शासनातर्फे रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. रायगड महोत्सवाच्या आयोजनासाठी चार-पाच दिवसांत राज्य शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत. अशा प्रकारचे रायगड महोत्सव आयोजित करण्यापेक्षा व त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी हाच खर्च रायगड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी करावा, अशी अपेक्षा शिवप्रेमी पर्यटकांकडून केली जात आहे.
केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून रायगडावर वर्षानुवर्षे किरकोळ कामे सुरू आहेत. यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधीदेखील येत असतो. हा निधी नक्की कुठे खर्च होतो, हा एक संशोधनाचा विषय आहे. जगाच्या पाठीवर छत्रपती शिवरायांचे नाव एक आदर्श राजा म्हणून घेतले जाते. मात्र त्यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याची मात्र आज दुरवस्था पाहायला मिळत आहे. कोसळलेले कठडे, पायऱ्यांची झालेली पडझड यामुळे आणखी किती बळी घेण्याची वाट पुरातत्त्व विभागाचे अधिकारी पाहणार आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया शिवभक्त पर्यटकांतून व्यक्त केल्या जात आहेत. (वार्ताहर)

Web Title: Traveler's death at Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.