- दत्ता म्हात्रे, पेणआर्थिक समृद्धीचे नवे दालन म्हणून पर्यटन उद्योग हा सक्षम रोजगार निर्मितीचा स्रोत ठरत आहे. आज जगभरात पर्यटन व्यवसायाची भरभराट वेगाने होत आहे. केंद्र व राज्य सरकार आता या व्यवसायाकडे उद्योग म्हणून पाहत असतात. राज्य सरकार पर्यटन क्षेत्राच्या विकासावर भर देण्याचे नवे धोरण निश्चित करू पाहत आहे. पुढील दशकभरात पर्यटनक्षेत्राचा विकासाचा रोडमॅप तयार करताना महाराष्ट्र राज्य पर्यटन क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टातून रोजगार निर्मिती व ग्रामीण विकासाला चालना मिळणार असून पर्यटनपूरक सेवा-सुविधांबरोबर कृषिपूरक पर्यटनाकडे लक्ष केंद्रित होणार आहे. पर्यटन उद्योगात बळीराजाच्या आर्थिक उन्नतीची नवी दिशा येत्या दशकभरात पहावयास मिळणार आहे.पुढील वर्ष २०१७ ‘व्हिजीट महाराष्ट्र इयर’म्हणून साजरे करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्राची संस्कृती, गडकोट किल्ले, कोकणचे विस्तीर्ण समुद्रकिनारे, कोकणची वैभवशाली निसर्गसंपदा माहिती व्हावी. त्यातून पर्यटकांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन धोरण २०१६ जाहीर केले आहे. या धोरणाच्या अनुषंगाने पर्यटनस्थळाचा विकास व यासाठी खाजगी गुंतवणूक सुविधांवर भर देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात विशेषत: कोकण किनारपट्टीवर निसर्ग सौंदर्याचा नजराणा आहे. प्राकृ तिक सौंदर्याला आधुनिक सोयी-सुविधांचा टच दिल्यास गोव्याच्या धर्तीवर पर्यटन उद्योगातून आर्थिक विकासाचा मापदंड निर्माण होणार आहे. यामध्ये वन्यजीवांचे संरक्षण उपजत वनसंपदेला धक्का न लावता स्थानिक रोजगार निर्मिती करण्याची क्षमता निसर्ग पर्यटनामध्ये आहे. राज्य सरकारने नव्या पर्यटन धोरणात विशेष पर्यटन विकास अभ्यासक्रमासाठी तसेच गाइड प्र्रशिक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीला १२ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती व ५ हजार रुपये आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे. नव्या पर्यटन धोरणामध्ये सरकारने धार्मिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटनाकडे खास लक्ष दिलेले आहे. कृषी पर्यटनामुळे शेती व शेतकरी वर्गाच्या रोजगार निर्मितीवर अधिक भर दिला जाणार आहे. सध्या नागरी वस्तीतील मध्यम व उच्च मध्यमवर्ग कृषी पर्यटनाकडे जाण्याचा कल वाढला आहे. कोकण निसर्ग संपदा, फळबागा व शेतीने समृद्ध आहे. या अनुषंगाने कोकणात पर्यटनाच्या वाढ विस्ताराच्या सुलभ सोयी निर्माण करण्यावर राज्य शासनाने अधिक भर देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील वैशिष्ट्येजिल्ह्यात एकूण १ लाख १३ हजार हेक्टर भातलागवड क्षेत्र आहे. फळबाग लागवडक्षेत्र ५१ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. कोकणच्या ७२० चौ.कि. मी. सागरी किनारपट्टी क्षेत्रांपैकी २४० चौ.कि.मी. रायगडची समुद्र किनारपट्टी आहे. २८ जलसिंचन प्रकल्पामधून ओलिताखालील क्षेत्रही मोठे आहे. रोजगाराच्या संधीनव्या पर्यटन धोरणात राज्यात सरकारचे ३० हजार कोटीची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य आहेत, यातून १० लाखांच्या रोजगारांच्या संधी निमीतीचे उद्दिष्ट आहे. १५ पैकी पनवेल, उरण वगळता १३ तालुक्यांमध्ये कृषी पर्यटन बहरण्याच्या संधी आहेत. राज्य सरकार कृ षीक्षेत्राकडे देणार लक्ष राज्य सरकारने महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ४८ अभयारण्ये, सहा राष्ट्रीय उद्याने, चार राखीव संवर्धन क्षेत्र, ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्र, या पर्यटन क्षेत्राबरोबर, खाड्यांच्या पात्रात येणारे परदेशी पक्षी यांचाही समावेश आहे. राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार दरवर्षी वन्यजीव क्षेत्राला १० लाख पर्यटक भेट देतात. याचबरोबरीने कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष दिल्यास हिरव्यागार वनराईबरोबर बहरलेल्या हिरव्या शिवारात पक्ष्यांचे थवे येणार ही पक्षिमित्रांसाठी पर्वणी आहे. त्यामुळे वन्यजीव क्षेत्र पर्यटन, धार्मिक स्थळे, गडकोट-किल्ले पर्यटन, समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सोबतीने कृषी शिवारातील पर्यटन विकासास चालना दिल्यास शेतकऱ्यांच्या रोजगार निर्मितीत अधिक भर पडेल.
पर्यटनातून ग्रामीण विकासाला चालना
By admin | Published: March 17, 2016 2:28 AM