कुपोषण निर्मूलनासाठी कर्जतमध्ये उपचार केंद्र; कर्जत उपविभागीय महसूल अधिकारी घेणार दर महिन्याला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 04:17 AM2018-02-04T04:17:55+5:302018-02-04T04:18:11+5:30
कर्जत तालुक्यांतील कुपोषणाची समस्या दूर करण्याकरिता आवश्यक असणारे ग्राम बाल पोषण केंद्र (व्हीसीडीसी) येत्या दोन दिवसांत कर्जत तालुका स्तरावर तर पुढील ५ दिवसांत कर्जत उपजिल्हा रुग्णालय स्तरावर बाल उपचार केंद्र(सीटीसी) सुरू करण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी शुक्रवारी आरोग्य आणि महिला बालविकास विभागाला दिले आहेत.
कर्जत/अलिबाग : कर्जत तालुक्यांतील कुपोषणाची समस्या दूर करण्याकरिता आवश्यक असणारे ग्राम बाल पोषण केंद्र (व्हीसीडीसी) येत्या दोन दिवसांत कर्जत तालुका स्तरावर तर पुढील ५ दिवसांत कर्जत उपजिल्हा रुग्णालय स्तरावर बाल उपचार केंद्र(सीटीसी) सुरू करण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी शुक्रवारी आरोग्य आणि महिला बालविकास विभागाला दिले आहेत. त्याचबरोबरच, कर्जत उपविभागीय अधिकाºयांच्या नियंत्रणाखाली दर महिन्यास आरोग्य, महिला बालकल्याण, शिक्षण व रोजगार विभागाच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक घेउन आढावा घेण्याचे निर्देशदेखील सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत तालुक्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनला होता. स्थानिक दिशा केंद्र या सामाजिक संस्थेने वेळोवेळी बैठक घेण्याची विंनती केली होती. त्यानुसार, जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी शुक्रवारी कर्जत तहसीलमध्ये सर्व संबंधितांची बैठक आयोजित केली होती.
बैठकीमध्ये दिशा केंद्राच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांनी कुपोषण कमी करण्यासाठी शासकीय विभागात समन्वय, आदिवासी स्थलांतराच्या नोंदी, शाश्वत व दीर्घकालीन रोजगार, बालविवाह, कुटुंबनियोजन आदीबाबत जनजागृती करणे, उपाययोजनांची मांडणी करून तालुक्यातील आरोग्य समस्या, रिक्त पदे भरण्याबाबत निवेदन दिले. आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम व मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेच्या प्रश्नाकडे जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधले. बांधकामाचा मुद्दा लवकरच निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी या वेळी दिले.
बैठकीस रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पानबुडे, कर्जत उपविभागीय महसूल अधिकारी दत्ता भडकवाड, कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी, दिशा केंद्राचे कार्यकर्ते रवी भोइ, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ए.एस. क्षीरसागर, एकात्मिक बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. वाघमारे, विस्तार अधिकारी अमित काळे, अनिता ढमढेरे, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे निरीक्षक आनंद पाटील, तालुक्यातील सर्व आरोग्य पर्यवेक्षिका उपस्थित होते.
निधी देऊनही विलंब
दीड महिन्यापूर्वी निधी देऊनही ग्राम बाल पोषण केंद्र (व्हीसीडीसी) सुरू करण्यात आले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी संबंधीत अधिकाºयांना धारेवर धरले.
दरम्यान आदिवासी कुटुंबांसाठी दिशा केंद्राने सुचवलेला मधसंकलन प्रकल्प नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत यावेळी मंजूर करण्यात आला.