पोलादपूर : सोमवारी पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावल्याने झाडांच्या मुळांचा आधार सुटून झाडे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी दुपारी सव्वा एक वाजता पोलादपूर नगरपंचायत इमारतीजवळील सागाचे झाड अतिवृष्टीने नगराध्यक्ष नीलेश सुतार यांच्या मोटारसायकलवर कोसळले. दैव बलवत्तर म्हणून नगराध्यक्ष बचावले तर तालुक्यातील सडवली आदिवासी वाडी येथील दोन घरे पडली असल्याची माहिती प्राप्त झाली असून घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे.
सोमवारी सकाळपासून पावसाने जोर धरला असून तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील पावसाचा जोर कायम असून सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे नगराध्यक्ष नीलेश सुतार हे गाडी लावून नगरपंचायतीमध्ये कामकाज पाहण्यासाठी आले होते. आपल्या कार्यालयात जाऊन आसनस्थ होत असताना अचानक बाहेर जोराचा आवाज झाला म्हणून सर्व कर्मचारी व नगराध्यक्ष बाहेर आले, तेव्हा झाड त्यांच्या गाडीवर कोसळले होते. नगराध्यक्ष नीलेश सुतार हे तेथे नसल्यामुळे त्यांना कोणतीहीइजा झाली नाही, मात्र त्यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.
तर दुपारी सडवली आदिवासी वाडी येथे दोन घरांचे नुकसान झाले आहे. यापैकी किसन शिवराम कोळी यांच्या घराची भिंत कोसळली आहे तर किसन काळू पवार यांनी घराचे पत्र काढून ठेवले होते मात्र त्यांच्या घराची भिंत कोसळली. किसन कोळी कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने घरात कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सडवली येथील तलाठी महाडिक यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पंचनामा करण्यात येणार असून अंदाजे ५० ते ५५ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.