कर्जत : तालुक्यातील नेरळ गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची जुनी इमारत तोडण्यात आली आहे. त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी कर्जत पंचायत समितीने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने शाळेच्या आवारातील जुनी झाडे तोडून टाकण्यास सुरु वात केली आहे. या वृक्षतोडीला स्थानिकांनी विरोध केला असून विनापरवानगी झाडे तोडणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.नेरळमध्ये कुंभारआळी भागात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून त्या ठिकाणी असलेल्या तीन इमारतीमध्ये वर्ग भरत होते. जुन्या झालेल्या इमारती पाडून तेथे चार मजली इमारत बांधण्याचे नियोजन रायगड जिल्हा परिषदेने केले आहे. नेरळ गावातील कन्या शाळा येथील १०० वर्षे जुनी इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधण्यासाठी जून २०१६ रोजी ती इमारत तोडण्यात आली. नेरळ गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या चार शाळा एकत्र करण्यासाठी चार मजली इमारत बांधण्यात येत असून त्यासाठी संपूर्ण परिसर मोकळा करण्यात येत आहे.संबंधित जागेवर चार मजली इमारत आणि शाळेच्या समोरून जाणारा रस्ता लक्षात घेऊन जुनी झाडे तोडली जात आहेत. त्याबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त करीत झाडांच्या रक्षणासाठी एकजूट केली आहे. झाडे तोडताना कोणतीही परवानगी संबंधित ठेकेदार कंपनीने घेतली नसल्याने कुंभारआळी ग्रामस्थांनी थेट वन अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. वन विभागाची परवानगी न घेता ठेकेदार झाडे तोडत असल्याने स्थानिकांनी झाडे तोडणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वन विभाग जुनी झाडे तोडण्यात येत असताना आक्षेप घेत नसल्याबद्दल श्रीशिवराज प्रतिष्ठानने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्र ार करण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)
बांधकामासाठी वृक्षतोड
By admin | Published: April 11, 2017 1:53 AM