लोणेरे- गोरेगाव रस्ता रुंदीकरणास झाडांचा अडथळा; संयुक्त मोजणी झाल्यानंतर अडथळा होणार दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 01:33 AM2021-03-28T01:33:08+5:302021-03-28T01:33:26+5:30
लोणेरेपासून रेल्वे ब्रिजपर्यंतच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दोन्ही बाजूचे गटार आणि एका बाजूला रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
मानगाव : लोणेरे गोरेगाव रस्ता रुंदीकरणाचे काम जलदगतीने सुरू आहे. परंतु, रस्त्याच्या कामात झाडांचा मोठा अडसर ठरत असल्यामुळे रुंदीकरणापूर्वी झाडे तोडणे गरजेचे होते. मात्र, संबंधित प्रशासन त्याबाबत उदासीन दिसते. ज्याठिकाणी झाडांचे अडथळे नाहीत, अशा ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा गटाराचे काम पूर्णत्वास येत आहे.
लोणेरेपासून रेल्वे ब्रिजपर्यंतच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दोन्ही बाजूचे गटार आणि एका बाजूला रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, या झालेल्या कामातही झाडांचा अडथळा आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्यामध्ये अडथळा आणणाऱ्या झाडांच्या बाजूने वाहतुकीसाठी डायव्हर्शन करून वाहतूक सुरू केली आहे. ही झाडे तोडण्याकडे वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागात समन्वय नसल्याने दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्या मध्येच मोठी झाडे असल्याने रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच रस्त्याच्या कामाला विलंबही होत आहे. ही झाडे लवकरात लवकर तोडावित, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
झाडे तोडण्यासाठी वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी संयुक्त मोजणी व पंचनामा करणे आवश्यक आहे. दोनवेळा वनविभागाचे अधिकारी तेथे गेले, पण सा. बां. विभाग व ठेकेदार उपस्थित नसल्याने मोजणी होवू शकली नाही, ती झाली की आम्ही याबाबत अहवाल वरिष्ठांकडे पाठवू. -प्रदीप पाटील, आर. एफ. ओ . रोहा
आठ दिवसांनंतर झाडे तोडण्याच्या कार्यवाहीस सुरुवात होईल .- शिवलिंग उलागडे, शाखा अभियंता सा. बां. विभाग, माणगाव