पनवेल : खारघर हिल्सवर मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास ट्रेकिंगसाठी आलेल्या तरुणांपैकी एक जण सुमारे ५० फूट दरीत कोसळून गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आल्याने त्याचा जीव वाचविण्यात यश आले.दिग्विजय शिंदे (१६) हा चार मित्रांसह खारघर हिलवर मंगळवारी ट्रेकिंगसाठी गेला होता. मात्र, तोल गेल्याने ५० फूट खोल दरीत पडला. जबर जखमी झाल्याने त्याला चालताही येत नव्हते. त्याच्या मित्रांनी या वेळी आरडाओरड केल्याने परिसरात मॉर्निंग वॉकला आलेले नागरिक मदतीसाठी धावून आले. यात खारघर कॉलनी फोरमच्या सदस्यांनी जखमी दिग्विजयला हिलच्या पायथ्याशी आणले आणि शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.खारघर हिलच्या पायथ्याशी दररोज सकाळी व्यायाम करण्यासाठी जमत असलेल्या फोरमच्या माध्यमातून अर्जुन गरड, कृष्णा कदम, बालेश भोजने, आनंद बैलकर, रवि नायर, सतीश गायकवाड, अंकुश कदम, अनुराग गुप्ता, सुरेश पटेल, तुषार कोळपे, नितीन कोळपे यांनी जखमी ट्रेकर्सला उचलून पायथ्याशी आणल्याने त्याला त्वरित उपचार मिळाले. गंभीर जखमी दिग्विजयला पुढील उपचारासाठी नवी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खारघर हिल्सवरून ट्रेकर दरीत कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 2:12 AM