जयंत धुळप ।अलिबाग : स्वातंत्र्य दिनी कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथे निसर्ग भ्रमंतीस गेलेले पण सूर्यास्तानंतर कोंढाणे जंगलात मुंबईतील बोरीवली येथील चार ट्रेकर्स वाट चुकले. त्यांना रातोरात उंबरवाडीतील आदिवासी बांधवांनी चार तासांत शोधून काढून कर्जत पोलिसांना मोठे सहकार्य केले.मंगळवारी रात्री ९.४५ वाजता वाट चुकलेल्या स्वप्निल मगदूम (२४), मिश्वाल सॅलियन (२४), ज्योती पळसमकर (२०), ज्युली डिसोझा (२२) या चौघांपैकी स्वप्निल कदमने कर्जत पोलीस ठाण्यात फोन करून, मी व माझ्यासोबतचे एक मित्र व दोन मैत्रिणी कोंढाणे येथील जंगलात वाट चुकलो आहोत, अशी माहिती पोलिसांना दिली. कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून, त्यांना आहात त्याच ठिकाणी एखाद्या सपाट जागेवर थांबून राहण्याचा सल्ला दिला. स्वप्निल यास आजूबाजूच्या खाणाखुणा विचारल्या. त्या वेळी त्यांनी, बाजूला उंचावरून पाणी पडत असल्याचे सांगितले. परिणामी, जवळ धबधबा असल्याचा अंदाज बांधून पोलीस निरीक्षक तानवडे यांनी त्वरित कोंढाणे गावचे पोलीस पाटील रवींद्र महादेव गायकवाड यांच्याशी संपर्क साधून काय उपाययोजना करता येईल, याबाबत चर्चा केली. कोंढाणे गावचे पोलीस पाटील रवींद्र गायकवाड व आदिवासी बंधू एरू जाणू मेंगार, मधू हिरू पीटकर, वाळकू कमळू निरगुडा (सर्व रा. उंबरवाडी) यांच्या मदतीने जंगल भागात धबधबा शोधण्यास प्रारंभ केला. अत्यंत धाडसाने एक ते दीड तासाने धबधब्याच्या आवाजाच्या दिशेने जंगल पादाक्रांत करून, या चौघांपर्यंत पोहोचण्यात या पथकास यश आले. त्यानंतर या चौघांना जंगलातून सुखरूप आणले गेले.>रात्रीच्या वेळी शोधकार्यास सुरुवातरात्रीची वेळ असल्याने या मुलांची सुटका करणे अवघड असतानाही पोलीस निरीक्षक तानवडे यांनी कोंढाणे गावातील स्थानिक आदिवासी बांधवांची मदत घेऊन कर्जत ठाण्याच्या पोलीस कर्मचाºयांना जंगलात रवाना केले.
आदिवासींच्या मदतीने ट्रेकर्सचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 2:02 AM