निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: या वर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती मोठ्या संख्येने घराघरात स्थापन झाल्या आहेत. शाडूच्या मूर्तीबरोबरच कागदी लगद्यापासून केलेल्या रेखीव मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत आहेत, तर काही युवकांनी एकत्र येऊन लाल मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
जिल्ह्यात इको-फ्रेंडली गणेशोत्सवाच्या कल अधिक वाढलेला दिसत असून, गणपतीसाठी रासायनिक रंगाऐवजी हळद, मुलतानी माती, गेरूचा, तसेच भाज्यांपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर करीत मूर्तीची रंग सजावट केली आहे. या वर्षी आम्ही गणेश मूर्तीबरोबरच शाडूच्या गौरीही उपलब्ध केल्या आहेत. मूर्तीमध्ये मधुबनी गणेश, राजबैठक, गजवक्र शीलापीठ, शेषनाग गणेश आदी विविध प्रकार उपलब्ध आहेत.
मूर्तीबरोबरच सजावटीचे साहित्यही पर्यावरणपूरकच असावे,याबद्दल जिल्हावासी आग्रही दिसत आहेत. त्यामुळे मुलांनी घरोघरी पेपर, रर्दी, पुढे, कागदी फुलांपासून तयार केलेले 'इको-फ्रेंडली' सजावट साहित्याने जिल्ह्यातील घरे सजलेली दिसत आहेत. थर्माकोलप्रमाणेच दिसणारे 'शोलापीट' या लाकडापासून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तूही नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत. शोलापीट हे नैसर्गिक असल्याने पर्यावरणाला कोणताही धोका नाही. याचे दागिने आणि सजावटीच्या वस्तू तयार केल्या आहेत.
आदिवासी समूहातील कारागिरांनी पाम झाडाच्या पानापासून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू यंदा पहिल्यांदाच समोर आल्या आहेत. पर्यावरणपूरक असा गणपती तयार करावा, तसेच नागरिकांमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तीची संकल्पनेला पाठिंबा मिळावा, यासाठी तरुणाई पुढे आली आहे. या तरुणाईने गणेशमूर्ती तयार करणाऱ्या चित्रशाळांमध्ये जाऊन माती व पर्यावरणपूरक अशा मूर्तीची मागणी केल्याने कारखानदारांना खास इको-फ्रेंडली गणेशमूर्ती तयार कराव्या लागल्या आहेत.
घरात असलेले पुठ्ठे व पेपर रद्दी एकत्र करून गणपतीची सजावट केली आहे. त्याला नॅचरल रंगाने रंगविले असून, आम्ही गणपतीही मातीचा आणला आहे, तसेच फुले व फळभाज्यांच्या बिया मूर्तीचे काम करताना वापरण्यात आल्या आहेत. जेणेकरुन पार्यावरणाचेही संवर्धन होणार आहे.- जयंत वार्डे