गणेशोत्सवासाठी सजल्या बाजारपेठा, वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:28 AM2017-08-24T03:28:17+5:302017-08-24T03:28:19+5:30
येथील बाजारपेठेत जवळपास ८३ गावांतील नागरिक खरेदीसाठी येत असतात. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने म्हसळा बाजारपेठेमध्ये आरास करण्यासाठी लागणा-या वस्तू खरेदीसाठी, तसेच घरसजावटीच्या वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे.
म्हसळा : येथील बाजारपेठेत जवळपास ८३ गावांतील नागरिक खरेदीसाठी येत असतात. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने म्हसळा बाजारपेठेमध्ये आरास करण्यासाठी लागणा-या वस्तू खरेदीसाठी, तसेच घरसजावटीच्या वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे.
केंद्र शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या वस्तू सेवा कर म्हणजे जीएसटीमुळे अगरबत्तीपासून मखरासारख्या शोभेच्या वस्तूंचे दर वाढल्याने याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. गणपतीसाठी आरत्या, मंत्र तसेच रंगीबेरंगी बल्बचा झगमगाट नयनरम्य वाटतो. सोनेरी, चंदेरी लेप चढवून सजवलेल्या इलेक्ट्रिक पणत्या व दीपमाळा लक्ष वेधून घेत आहेत. देखाव्यात रंगीबेरंगी लुकलुकणाºया विजेच्या तोरणांपासून देखाव्याचे सामान, फुले, फळांनी बाजार बहरला आहे. गणेशोत्सवासाठी बाजारात मोगरा, चमेली, शेवंती, काकडा, गुलाब, लीली आदी फुलांनी हजेरी लावली आहे. सोनचाफा व केवडा या स्थानिक फुलांना या काळात मोठी मागणी असल्याने यांचा भाव वधारलेला असतो. गणपतीत सफरचंद, पपनस, पेर, केळी, मोसंबी या फळांना मागणी असल्यामुळे बाजार फळांनी सजला आहे.
दोन दिवसांवर उत्सव आल्याने जवळपास सर्व गणेश मंडळातील कामे आटोपत आली तरी बारीकसारीक कलाकुसरीची कामे सुरू आहेत. नोटाबंदी व जीएसटीमुळे खिशाला झळ बसणार असली तरी गणरायाच्या चाहुलीने बाजारपेठांत नवचैतन्य आहे.