- गिरीश गाेरेगावकर
माणगाव : तालुक्यातील विळेभागाड औद्योगिक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीमध्ये स्फाेट झाल्याने रायगड जिल्हा हादरला आहे. स्फाेट हाेण्यापूर्वी कंपनीमध्ये घेण्यात आलेली चाचणी ही अवैध हाेती. कंपनीने त्यासाठी आवश्यक ती काेणतीच परवानगी घेतील नव्हती, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अंकुश खराडे यांनी 'लाेकमत'शी बाेलताना दिली.
क्रिप्टझो कंपनीमध्ये आग विझवण्यासाठीची उपकरणांचे उत्पादन केले जाते. 15 नाेव्हेंबर राेजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आग विझवण्याची अवैधरित्या चाचणी सुरु असताना स्फोट होऊन 18 जण गंभीररित्या जखमी झाले. पैकी दाेन कामगारांचा 16 नाेव्हेंबर राेजी मृत्यू झाला. कंपनीला मशीन तयार करण्याची परवानगी काही महिन्यापूर्वीच देण्यात आली असल्याची बाब समाेर आली आहे. कंपनीत गॅस भरून सिलेंडर तयार करण्याचे काम सुरु हाेते. सिलेंडर रिफीलची प्रोसेस वैध हाेती. मात्र कंपनीमध्येच केलेली चाचणी ही अवैध असल्याचे खराडे यांनी स्पष्ट केले.
कंपनीने या चाचणीकरीता आवश्यक ती परवानगी घेतली नव्हती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, कंपनीला अशी चाचणी करण्याची काेणतीच परवानगी नसतानाही तशी चाचणी करण्यात आली. अशी चाचणी करण्याची परवानगी काेणी दिली. हे लवकरच तपासामध्ये पुढे येणार आहे.