रोह्यात बहुसंख्य ठिकाणी तिरंगी लढत?
By Admin | Published: February 13, 2017 05:07 AM2017-02-13T05:07:27+5:302017-02-13T05:07:27+5:30
सोमवारी, १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
रोहा : सोमवारी, १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सोमवारी दुपारी ३ नंतर लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी तालुक्यात बहुसंख्य ठिकाणी तिरंगी लढतींची शक्यता दिसून येत आहे. या निवडणुकीसाठी शेकापने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जिल्ह्यात आघाडी केली असून, भाजपा व शिवसेना मात्र स्वतंत्रपणे नशीब आजमावत आहेत.
रोहा तालुक्यात नागोठणे, आंबेवाडी, वरसे आणि खारगाव असे जिल्हा परिषदेचे चार गट आहेत. वरसे गटातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे रिंगणात असून त्यांच्याविरोधात सेनेचे तालुकाध्यक्ष संजय देशमुख यांच्या पत्नी मंगल देशमुख, भाजपा युवा अध्यक्ष अमित घाग यांच्या सौभाग्यवती श्रद्धा घाग, तसेच मनसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर खरीवले यांच्या पत्नी रेखा खरीवले, शेकाप चिटणीस राजेश सानप यांच्या पत्नी राजश्री सानपही रिंगणात असल्याने वरसे जिल्हा परिषद गटामधील निवडणूक चुरशीची होणार आहे. आंबेवाडी गटातून राष्ट्रवादीचे दयाराम पवार, सेनेचे महादेव जाधव, शेकाप उमेदवार मोतीराम वाघमारे रिंगणात आहेत. नागोठणे गटातून सेनेचे किशोर जैन, राष्ट्रवादीचे नरेंद्र जैन, संभाजी बिग्रेडकडून सुहास येरुणकर, भाजपाकडून अंकुश सुटे, शेकाप चिटणीस राजेश सानप रिंगणात आहेत. खारगाव गटातून राष्ट्रवादीकडून तालुका अध्यक्ष मधुकर पाटील, सेनेचे उद्देश वाडकर यांच्याविरोधात शेकापकडून आस्वाद पाटील यांना उमेदवारी दिल्याने रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत रंगत आली आहे.
स्थानिक शेकाप कार्यकर्त्यांनी खारगाव गट शेकापला सोडण्यात यावा, अशी मागणी लावून धरली होती. या गटाचा बराचसा भाग शेकाप आ. पंडित पाटील यांच्या मतदार संघात येत असल्याने कार्यकर्त्यांच्या मागणीला पाठिंबा देत शेकापकडून आस्वाद पाटील यांना रिंगणात उतरविल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. सोमवारी राष्ट्रवादीकडून मधुकर पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला नाही तर शेकाप कार्यकर्त्यांकडून तालुक्यात सर्वत्र नाराजी पसरेल आणि याचा फटका तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व जागांना बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. तालुक्यातील धाटाव पंचायत समिती गण वगळता सर्व ठिकाणी शेकापकडून अर्ज दाखल के ले आहेत. ऐनघर आणि खारगाव गणात राष्ट्रवादीकडून उमेदवार उभे करण्यात आलेले नाहीत. यामुळे या दोन्ही ठिकाणी शेकाप आणि सेना यांच्यात सरळ लढत होणार आहे. खारगाव गणात शेकाप उमेदवार गुलाब वाघमारे यांचे पारडे जड आहे. विरजोली गणात राष्ट्रवादीचे उमेदवार रामचंद्र सकपाळ यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील संतोष पार्टे, आत्माराम कासार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत. या गणात शेकापकडून प्रकाश धुमाळ आणि गोपीनाथ गंभे यांचे अर्ज आहेत. सेनेचे उमेदवार सचिन फुलारे यांचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी विरु द्ध अपक्ष किंवा शेकाप अशी लढत अपेक्षित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने रोहेकरांना खारगाव, नागोठणे, वरसे या जिल्हा परिषद गटातून तसेच ऐनघर, आंबेवाडी, वरसे, विरजोली या पंचायत समिती गणातून अटीतटीच्या लढती बघावयास मिळणार आहेत. कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कोणता उमेदवार आपला अर्ज कायम ठेवणार याची चर्चा रंगली आहे.