सौर ऊर्जेवर चालणार वावळोली येथील आदिवासी आश्रमशाळा
By Admin | Published: April 13, 2016 01:24 AM2016-04-13T01:24:51+5:302016-04-13T01:24:51+5:30
ग्रामीण भागातल्या आदिवासी मुला-मुलींना शिक्षण मिळावे या हेतूने १९५८ मध्ये शिक्षणमहर्षी कै. दादासाहेब लिमये यांनी सुरू केलेल्या वावळोली येथील कुलाबा जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत
पाली : ग्रामीण भागातल्या आदिवासी मुला-मुलींना शिक्षण मिळावे या हेतूने १९५८ मध्ये शिक्षणमहर्षी कै. दादासाहेब लिमये यांनी सुरू केलेल्या वावळोली येथील कुलाबा जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत आज ९५० विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. संपूर्ण शाळेला २४ तास पुरेल अशी सोलर वीजनिर्मितीचा ३० किलोवॅट क्षमतेचा प्लांट इंडिया बुल्स फाउंडेशनच्या मदतीने पूर्ण होवून मंगळवारी आश्रमशाळा वीजमुक्त झाली आहे.
इंडिया बुल्स फाउंडेशनचे कार्यकारी संचालक महंमद आली सलील यांच्या हस्ते सोलर प्लांटचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व भौतिक गरजा आपल्या कुवतीनुसार पूर्ण करण्याच्या व शाळेच्या प्र्रगतीच्या उद्देशाने सुमारे ३० लाख रुपये किमतीचा हा एबीएस एनर्जी सिस्टीमचा सोलर एनर्जी प्लांट संस्थेला देण्यात आला आहे. यावेळी बोलताना वाबळे म्हणाले की, ३० किलोवॅट वीज तयार करण्यासाठी शेकडो टन कोळसा लागतो. त्याची बचत नक्की होणार असून पर्यायाने अनेक नैसर्गिक स्रोतांची बचत यामुळे होणार आहे. याची देखरेख कशी करावी, यासाठी कंपनीतर्फे एका कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी फाउंडेशनच्या उपमहाव्यवस्थापिका नूरजहाँ शेख, सुनील वाबळे, जयंत रुठे, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लिमये, सचिव प्रतिभा दुर्वे, सुएसोच्या संचालिका शिल्पा लिमये सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
महावितरणचे विजेचे एका महिन्याचे सुमारे ४० हजार रुपये बिल या सोलर प्लांटमुळे वाचणार आहे. संस्थेच्या वतीने सर्व शैक्षणिक, भौतिक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असताना शाळेतील शिक्षकवृंद आदिवासी मुलांना योग्य अध्यापन करत असल्यामुळे आज अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, शासकीय व प्रायव्हेट सेक्टरमध्ये उच्च पदावर काम करीत आहेत. हाच आमचा सर्वांचा आनंद व अभिमान आहे.
- रवींद्र लिमये, अध्यक्ष, कुलाबा आदिवासी आश्रमशाळा, वावळोली