वावोशी : आदिवासीवाडीसाठी वनविभाग आडकाठी करत असल्यामुळे अनेक वर्षे रस्ता नसून, ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णांना झोळीतून नेण्याची वेळ येत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. त्यावर वनविभागाच्या अधिकाºयांनी अशा गोष्टीसाठी डोळे बंद करा व रस्ता होऊ द्या, अशा सूचना आमदार मनोहर भोईर यांनी दिल्या. खालापूर पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी दुपारी १२ वाजता आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नऊ गावांतील येऊ घातलेल्या ‘नैना’ प्रकल्पाचीही चर्चा करण्यात आली. लवकरच सिडको प्रशासन आणि शेतकरी यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन या वेळी आमदार भोईर यांनी दिले. पाणीप्रश्नावरही आमसभेत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.अॅडलॅब इमॅजिका वॉटरपार्कला कलोते धरणातून पाणीपुरवठा करण्यात येऊ नये, अशी भूमिका घोडवलीचे सरपंच शिवाजी पिंगळे यांनी मांडली. या वेळी अॅडलॅबची बाजू मांडणाºया राष्ट्रवादी पदाधिकाºयाला पिंगळे यांनी त्यांची वकील करू नका, असा सल्ला देत गप्प बसविले. पाताळगंगा नदीत अल्प पाणीसाठा शिल्लक राहत असताना खासगी प्रकल्पाकडून उपसा करण्यात येत असल्यामुळे भविष्यात खालापूरला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल त्यामुळे बेकायदा उपसा थांबवा, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते नवीनचंद्र घाटवळ यांनी केली. वाणविली विहीरचोरी प्रकरणी अद्याप काहीच कारवाई झाली नसल्यामुळे तक्रारकर्ते मनोज थोरवे यांनी संताप व्यक्त करत दोषीवर कारवाईला प्रशासन चालढकल करत असल्याचा आरोप केला. सावरोली येथील बंद कोपरा कामगारांच्या निधनामुळे संसार उघड्यावर पडलेल्या महिलांनीदेखील आमसभेत कारखान्याकडून काहीच देणी न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आल्याची व्यथा मांडली. आमदार मनोहर भोईर व आमदार सुरेश लाड यांनी याप्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणी केली. यावेळी आमदार मनोहर भोईर, कर्जत खालापूरचे आमदार सुरेश लाड, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे आदी उपस्थित होते.
रस्ता नसल्याने आदिवासी बांधव त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 2:17 AM