कर्जतमध्ये आदिवासी समाजाची रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 05:57 AM2017-08-10T05:57:45+5:302017-08-10T05:57:45+5:30
जागतिक संघटना असलेल्या युनोस्कोने ९ आॅगस्ट हा जागतिक आदिवासी दिन जाहीर केला आहे. त्यानिमित्त कर्जत तालुक्यातील आदिवासी समाज आपली शक्ती दाखविण्यासाठी रस्त्यावर उतरला होता. हजारोच्या संख्येने दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावर आल्याने आदिवासी समाजाच्या रॅलीच्या निमित्ताने संपूर्ण कर्जत तालुका ढवळून निघाला.
कर्जत : जागतिक संघटना असलेल्या युनोस्कोने ९ आॅगस्ट हा जागतिक आदिवासी दिन जाहीर केला आहे. त्यानिमित्त कर्जत तालुक्यातील आदिवासी समाज आपली शक्ती दाखविण्यासाठी रस्त्यावर उतरला होता. हजारोच्या संख्येने दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावर आल्याने आदिवासी समाजाच्या रॅलीच्या निमित्ताने संपूर्ण कर्जत तालुका ढवळून निघाला. या रॅलीमध्ये आदिवासी समाजाने केवळ शक्ती नाही तर आदिवासी समाजातील रूढी, परंपरा आणि चालीरिती यांची माहिती देणारे कलापथक या रॅलीत सहभागी होते.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेच्या वतीने जनजागृती रॅली आणि संस्कृती परंपरा यांचे प्रदर्शन करणारे कलापथक यांचे कार्यक्र म आयोजित केले होते. आदिवासी समाजातील महिलांची ओळख असलेल्या चोळी कापड यांचा झेंडा लावलेल्या हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या बाईक रॅलीला नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्ट समाजाच्या राज्य उपाध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य अनसूया पादीर यांच्या हस्ते झेंडा फडकावून सुरु वात झाली. नेरळ गावातून रॅली कर्जत रस्त्याने माथेरान फाट्यावरील हुतात्मा चौकात आली. त्या ठिकणी हुतात्म्यांना अभिवादन करून ही रॅली कर्जत रस्त्याने कर्जत शहरात पोहचली. कर्जत येथील तहसील कार्यालयात रॅली आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी निघाली. तेथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही रॅली कर्जत बाजारपेठेतील कपालेश्वर मंदिर येथे पोहचली. तेथे आदिवासी कालपथकाने संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्र म सादर केले.
रॅली कळंब येथील नाक्यावर पोहचल्यानंतर त्या ठिकाणी आदिवासी कलापथकाने आदिवासी नृत्य सादर करून जागतिक आदिवासी दिनाचा आनंद साजरा केला. गतवर्षी या रॅलीला आदिवासी समाजाने दाखविलेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेऊन शेजारच्या मुरबाड तालुक्यातील आदिवासी समाज देखील रॅलीमध्ये सहभागी झाला होता. त्यामुळे पुढे ही रॅली म्हसा येथे पोहचली. तेथे आदिवासी समाजाने पुन्हा एकदा आदिवासी संस्कृती, परंपरा यांचे प्रदर्शन विविध गाणी आणि नृत्य सादर करून केली.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त निघालेल्या रॅलीचे नेतृत्व संघटनेचे तालुका अध्यक्ष जैतू पारधी, उपाध्यक्ष गजानन भला, हिरू निरगुडा, सचिव मोतीराम पादिर,खजिनदार वसंत ढोले , सहसचिव दत्तात्रय हिंदोळा आदींनी केले. मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे आदिवासी रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीदरम्यान कर्जत तालुक्यातील सर्व रस्त्यांवर वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी कर्जत पोलीस आणि नेरळ पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.